म्हापसा अर्बनच्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्याचा मार्ग मोकळा

0
113

>> बँकेच्या लिक्विडेटरपदी दौलत हवालदार नियुक्त

 

केंद्रीय सहकार निबंधकांनी म्हापसा अर्बन बॅँकेच्या लिक्विडेटरपदी वित्त सचिव दौलत हवालदार (आयएएस) यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे बँकेतील ठेविदारांच्या ठेवी परत मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हापसा अर्बन बँकेचा बँकिंग परवाना १६ एप्रिलला रद्द केल्यानंतर बँकेवर लिक्विडेटरची नियुक्ती करण्याची शिफारस केंद्रीय सहकार निबंधकांना केली होती. त्यानुसार बँकेवर लिक्विडेटर म्हणून वित्त सचिव हवालदार यांची एक वर्षासाठी नियुक्ती केली जात आहे, असे केंद्रीय सहकार निबंधक विवेक अगरवाल यांनी २३ एप्रिलला जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आल्याने ठेवीदार, भागधारक, खातेदार यांच्यात खळबळ माजलेली आहे. ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी अनेक वर्षे अडकून पडल्या आहेत. आरबीआयने परवाना रद्द केल्याने ठेवीची  रक्कम कधी परत मिळेल याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले होते. या बँकेत ३५४.९७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच, अतिरिक्त २४५.८४ कोटी रुपये आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरू नये. त्यांच्या ठेवी परत मिळतील, असे बँक व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.

आता, लिक्विडेटरच्या नियुक्तीमुळे बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी ठेवीदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन म्हापसा अर्बनचे गोवा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याची विनंती केली होती. परंतु, विलीनीकरण शक्य नसल्याने ठोस आश्‍वासन देण्यात आले नव्हते.  लिक्विडेटरच्या नियुक्तीमुळे बँकेकडून सर्व देणी फेडून व्यवहार कायमचा बंद केला जाणार आहे.