म्हादई प्रश्‍न सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांसमोर मांडावा ः दिगंबर कामत

0
122

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईचा प्रश्‍न सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्याची गरज आहे. तसेच, कर्नाटकाच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी कृती दलाची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन ठरावावरील चर्चेत बोलताना काल केली.
म्हादईच्या प्रश्‍नावर खास अधिवेशन घेऊन ठराव संमत केल्यास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे हात आणखीन मजबूत होऊ शकतात, असेही कामत यांनी सांगितले.

मडगाव येथील जिल्हा इस्पितळाचे काम त्वरित मार्गी लावून दक्षिण गोव्यातील नागरिकांना दिलासा द्यावा. या इस्पितळाचे काम करणार्‍या ठेकेदारांची प्रलंबित बिलांची रक्कम वितरित करावी. दक्षिण गोव्यात सुसज्ज सरकारी इस्पितळाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळावरील ताण वाढत आहे, असेही कामत यांनी सांगितले.
राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना आगामी काळात खर्चाच्या बाबतीत झारीतील शुक्राचार्य बनून काम करावे लागणार आहे. आर्थिक बाबतीत प्रश्‍नावर वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्याने दिशाभूल होत आहे. राज्यात येणार्‍या पर्यटकांची पोलीस यंत्रणेकडून तपासणीच्या नावावर होणार्‍या सतावणुकीमुळे राज्याचे नाव बदनाम होत आहे. लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जाच्या शुल्कात ५ रुपयांवरून १०० रुपये एवढी करण्यात आलेली वाढ अन्यायकारक आहे, असेही कामत यांनी सांगितले.