म्हादईप्रश्‍नावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

0
45

>> सत्तेसाठी भाजपकडून म्हादईचा बळीः विरोधकांचा आरोप

म्हादई नदीच्या प्रश्‍नावरून काल गोवा विधानसभेत सत्ताधारी भाजप व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपला कर्नाटकात सत्ता मिळावी यासाठी गोवा सरकारने म्हादईचा बळी दिल्याचा आरोपही यावेळी विरोधकांनी केला. या संबंधीचा मूळ प्रश्‍न अपक्ष आमदार रोहन खंवटे तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, विनोद पालयेकर व जयेश साळगांवकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. म्हादई नदीची सध्याची स्थिती काय आहे असा मूळ प्रश्‍न होता व तो मागच्या अधिवेशनात विचारला होता. त्यावेळी हा प्रश्‍न पुढे ढकलण्यात आल्याने तो काल चर्चेला आला होता.

यावेळी रोहन खंवटे यांनी सरकारवर एकामागून एक आरोप करायला सुरुवात केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जलसंसाधन मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांच्याबरोबर रोहन खंवटे, विजय सरदेसाई व सुदिन ढवळीकर यांची जोरदार शाब्दिक चकमक झाली.

यावेळी रोहन खंवटे यांनी म्हादई नदीप्रकरणी सरकारला आपली बाजू मांडण्यास पूर्ण अपयश आल्याने म्हादई नदी आता गोव्याच्या हातातून गेल्यातच जमा असल्याचा आरोप केला. म्हादईचे पाणी वळवण्यास बंदी घालण्यात आलेली असतानाही कर्नाटकने हे पाणी वळवून न्यायालयाच्या आदेशाचा कसा अवमान केला आहे हे योग्य प्रकारे न्यायालयासमोर मांडण्यास गोवा सरकारला अपयशच आले. तसेच सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी कर्नाटक सरकारने नामवंत वकिलांची नेमणूक केलेली आहे. परंतु गोवा सरकारला मात्र आपली बाजू मांडण्यासाठी चांगल्या वकिलांची मदत घेण्यास अपयशच आल्याचे खंवटे म्हणाले.

गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे किती पाणी आतापर्यंत कर्नाटकने वळवून नेले आहे हेही गोवा सरकारला माहीत नाही. म्हादईच्या पाण्याच्या क्षारतेचा अहवालही फार महत्त्वाचा आहे. पाण्याचे नमुने व्यवस्थितरित्या घेण्यात आलेले नाहीत. हे नमुने मे महिन्याही गोळा करायला हवे होते. पण ते केले गेले नसल्याचे खंवटे यांनी सांगितले.

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकमधील तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहून गोवा सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले होते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले.

पाणी वळवल्याची
सरकारची कबुली
यावेळी उत्तर देताना जलसंसाधन मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनी कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले आहे ही बाब खरी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, कर्नाटकने आतापर्यंत किती पाणी वळवले आहे तो आकडा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

दोन अवमान याचिका

दरम्यान, पाणी वळवण्यास बंदी असताना कर्नाटकने म्हादई नदीचे जे पाणी वळवले आहे त्याप्रकरणी गोव्याने दोन अवमान याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी एका याचिकेवर २ ऑगस्ट रोजी तर दुसर्‍या याचिकेवर ८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
म्हादईप्रश्‍नी कर्नाटकने जी जी गैरकृत्ये केलेली आहेत ती सगळी आम्ही सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहेत, असे यावेळी फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. कोविड महामारीमुळे सर्वोच्च न्यायालयातील म्हादईवरील सुनावणीवर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजय सरदेसाई यांनी तुम्ही येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हादईचा प्रश्‍न निकाली काढून गोमंतकीयांना चांगली बातमी देण्याचे आश्‍वासन द्याल का, असे विचारले. त्यावर हे प्रकरण न्यायालयात असल्याने आम्ही कोणतेही आश्‍वासन देऊ शकत नसल्याचे फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी सांगितले.