वादग्रस्त म्हादईप्रश्नी काल सावध भूमिका घेताना सभापती रमेश तवडकर यांनी म्हादईप्रश्नी गोवा विधानसभेत चर्चा होण्यासाठी आमदारांकडून योग्य त्या पद्धतीने प्रस्ताव आला तर त्याबाबत विचार केला जाईल असे सांगितले. म्हादईचा मुद्दा हा बर्याच काळापासून खितपत पडलेला असून या वादग्रस्त मुद्द्याने आता शिखर गाठले आहे. या वादग्रस्त मुद्द्याविषयी सरकारने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या मुद्द्यावर आता चर्चा होण्याची आवश्यकता असून राज्यातील सर्व चाळीसही आमदार याप्रश्नी राज्याच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले. सभापती या नात्याने आपण विरोधी आमदारांकडून येणार्या सकारात्मक अशा राजकीय विषयांवरील सूचनांचे सदैव स्वागतच करीत असल्याचे सांगून सदर सूचना सरकारसमोर ठेवण्यास तयार असल्याचे तवडकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.