म्हादईप्रश्नी गोवा योग्य दिशेने : मुख्यमंत्री

0
9

>> प्रवाह प्राधिकरणाच्या पाहणीनंतर कर्नाटकात होणारी निदर्शने त्याचेच द्योतक

म्हादई प्रवाह प्राधिकरण गोव्यासाठी योग्य निर्णय घेणार आहे. म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या पाहणीनंतर कर्नाटकात निदर्शने होणे म्हणजे आम्ही योग्य मार्गावर आहोत हे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

म्हादई प्रवाह
प्राधिकरणाच्या

पाहणीनंतर कर्नाटक राज्यात गोवा कदंब महामंडळाची बस अडवून सोमवारी निदर्शने करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, म्हादई प्रवाह हे स्वतंत्र प्राधिकरण असून, ते गोव्यासाठी योग्य तो निर्णय घेईल, असा आम्हाला विश्वास आहे.
म्हादई प्रवाह प्राधिकरणाने योग्य ठिकाणी आणि गोव्याच्या विनंतीनुसार पावसाळ्यात पाहणी केली आहे. नदी वळवण्याच्या प्रयत्नांबाबत कर्नाटक सरकार उघडे पडणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

म्हादई प्रवाह आपला तपासणीचा अहवाल भारत सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांना सादर करणार आहे. पाहणीनंतर कर्नाटकात निदर्शने करण्यात आली, तसेच आपला फोटोही जाळण्यात आला. कर्नाटकात म्हादईच्या पाहणीचा मुद्दा का निर्माण केला गेला हेच कळत नाही. याचाच अर्थ आम्ही योग्य मार्गावर आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, म्हादई प्रवाह प्राधिकरणाने म्हादई नदीची 4 ते 7 जुलै दरम्यान गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रवाह समितीची दुसरी बैठक बंगळुरू येथे 8 जुलैला घेण्यात आली. केंद्र सरकारने म्हादई नदीतील पाणी वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी या प्राधिकरणाची नियुक्ती
केली आहे.

गोवा 3 विरुद्ध कर्नाटक 30 : सरदेसाई
म्हादई प्रवाहच्या बैठकीदरम्यान गोव्याचे प्रतिनिधित्व 3 अधिकाऱ्यांच्या गटाने केले होते, तर कर्नाटक सरकारच्या 30 अधिकाऱ्यांचा गट कर्नाटकाची बाजू मांडत होता. म्हादई प्रवाहची बैठक सुध्दा बंगळुरुमध्येच झाली. गोव्याचे 3 अधिकारी किती बचाव करू शकतात? म्हादई प्रवाहने गोव्याला कोणताही न्याय दिला नाही, असा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला.