म्हादईच्या रक्षणासाठी सरकार गंभीर : मुख्यमंत्री

0
5

राज्य सरकार म्हादई नदीच्या प्रश्नाबाबत गंभीर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे रविवारी भेट घेऊन म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आमदार विरेश बोरकर यांनी राज्य सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करून म्हादई प्रश्नी गंभीर नसल्याची टीका केली आहे. युरी आलेमाव यांनी म्हादई प्रश्नी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार म्हादई प्रश्नावर गंभीर असून म्हादईच्या रक्षणासाठी आवश्यक पाऊल उचलत असल्याचे सांगितले.

म्हादई नदी वाचविण्यासाठी म्हादई अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित आवश्यक आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कर्नाटक सरकारकडून म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. राज्य सरकार म्हादई प्रश्नी गंभीर नाही, अशी टीका आलेमाव यांनी केली.
म्हादईप्रश्नी गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मिळत नाही, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.