म्हादईचे पाणी अडवल्यास गोव्याच्या पर्यावरणावर परिणाम ः सरदेसाई

0
267

कर्नाटक सरकारने बेकायदा जे म्हादईचे पाणी वळवले आहे त्याबाबत गोवा सरकारने तात्काळ पावले उचलून हे पाणी अडवले नाही तर येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत गोव्याच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती असल्याचे काल गोव फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तत्पूर्वी त्यांनी कर्नाटक सरकारने अशा प्रकारे म्हादईचे पाणी आपल्या राज्यात वळवले आहे व सगळे पाणी कर्नाटकच्या बाजूने जात असताना गोव्याच्या दिशेने येणार्‍या प्रवाहाचे रुपांतर कसे एखाद्या झर्‍यासारखे झाले आहे ते एका व्हिडिओद्वारे पत्रकारांना दाखवले.

आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी प्रमोद सावंत यांनी म्हादई नदी कर्नाटकच्या घशात घातल्याचा आरोपही यावेळी सरदेसाई यांनी केला. कर्नाटकने वळवलेले पाणी पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात अडवावे अन्यथा प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सरदेसाई यांनी यावेळी केली.

गोवा, कर्नाटक व केंद्रात अशा तिन्ही ठिकाणी भाजप सरकार असल्यानेच म्हादईचा गळा घोटला गेला असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला. हल्लीच पंतप्रधानांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी म्हादईचा मुद्दा उपस्थित केला नाही यावरून त्यांची बेफिकीरी दिसते असा आरोपही सरदेसाई यांनी केला.
प्रकाश जावडेकर व गजेंद्रसिंह शेखावत या दोघाही मंत्र्यांनी म्हादईप्रश्‍नी गोव्याचा घात केला असल्याचेही सरदेसाई म्हणाले. म्हादईप्रश्‍नी केंद्र सरकार प्रमोद सावंत यांना ब्लॅकमेल करीत असून म्हादईविषयी आवाज काढल्यास मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागेल असा इशारा नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिला असावा. आणि म्हणूनच ते केंद्र दरबारी म्हादईचा मुद्दा उपस्थित करीत नसावेत, अशी शंकाही सरदेसाई यांनी व्यक्त केली.