>> जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या प्रोग्रेसिव्ह रिव्हर अथॉरिटी फॉर वॉटर अँड हार्मनी (म्हादई प्रवाह) समिती येत्या 4 जुलै ते 7 जुलै 2024 दरम्यान म्हादई नदीची महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात पाहणी करणार आहे, अशी माहिती काल जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
म्हादई प्रवाह समितीचे म्हादई नदीच्या पाहणीसंबंधी पत्र मंगळवार 25 जूनला गोवा सरकारला मिळाले आहे. म्हादई प्रवाह समिती गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांत म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास करणार आहे. महाराष्ट्रात 4 जुलै रोजी पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर 5 आणि 6 तारखेला गोव्यातील सुर्ला, अंजुणा धरण, वाळवंटी नदी, सुर्ला, गांजे आदी भागात म्हादई नदीची पाहणी करणार आहे. 7 रोजी कर्नाटकातील कणकुंबी, कळसा-भांडुरा प्रकल्पासह हायड्रो प्रकल्पाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.
कर्नाटक सरकारने म्हादई नदीवर खोदकामाला सुरू केल्यानंतर गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याने म्हादई प्रवाह समितीला एक पत्र पाठवून म्हादई नदीची संयुक्त पाहणी करण्याची विनंती केली होती. गोवा सरकारच्या अर्जानुसार म्हादई नदीची पाहणी केली जाणार आहे. म्हादई पाणी विवाद न्यायाधिकरणाच्या निवाडा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी केंद्र सरकारने म्हादई प्रवाह समिती नियुक्त केली आहे.