यंदा अकरा दिवस अगोदरच पावसाचे राज्यात आगमन
केरळमधून विक्रमी वेळेत गोव्यात दाखल
पावसासाठी पोषक वातावरण
नैऋत्य मान्सूनचे काल रविवारी गोव्यात निर्धारित वेळेपूर्वीच आगमन झाले. तब्बल 11 दिवस आधी यंदा मान्सूनचे गोव्यात आगमन झाले आहे. गेल्या शनिवारी केरळ राज्यात दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनचे यंदा विक्रमी वेळेत गोव्यात आगमन झाले आहे. केरळमध्ये यंदा 8 दिवस अगोदर मान्सूनचे आगमन झाले तर त्या पाठोपाठ आता गोव्यात 11 दिवस अगोदर आगमन झाले आहे.
सामान्य परिस्थितीत केरळमध्ये 1 जूनला तर गोव्यात 5 जूनला नैऋत्य मान्सून आपली हजेरी लावत असते. केरळ, कर्नाटकनंतर आता मान्सून गोव्यात दाखल झालेले असून आता राज्यात पावसासाठीचे पोषक वातावरण आहे. त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसापाठोपाठ आता मोसमी पाऊस राज्यात जोरात होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मोसमी पाऊस आता गोव्यातून वेगाने पुढे सरकत देवगड (महाराष्ट्र), बेळगावपर्यंत (कर्नाटक) पोहोचला आहे. कर्नाटकातील काही भागांत शनिवारी हजेरी लावलेल्या मोसमी पावसाने आता तेथील आणखी काही भाग, महाराष्ट्रातील काही भाग, उत्तरेकडील बंगालची खाडी, तसेच ईशान्येकडील मिझोरम, मणिपूर व नागालॅण्डमधील काही भाग व्यापला आहे.
आता मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा काही भाग, मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भाग, तसेच कर्नाटकची राजधानी बेंगळुरू, आंध्रप्रदेशातील काही भाग, तामिळनाडूतील उर्वरित भाग, तसच बंगालच्या खाडीचा पश्चिम मध्य व उत्तरेकडील भाग तसेच ईशान्येकडील राज्यातील उर्वरित भागांत पुढील तीन दिवसांत दाखल होणार आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
आतापर्यंत 436 मिमी पाऊस
दरम्यान, उन्हाळा संपण्यासाठी अजून एक आठवडा बाकी असतानाच आतापर्यंत राज्यात कोसळलेला मान्सूनपूर्व पाऊस हा 436.1 मी.मी. एवढा असून तो गेल्या 64 वर्षांतील तिसरा सर्वाधिक ठरला आहे. 1961 साली जेव्हा गोवा पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला होता त्यावर्षी कोसळलेला मान्सूनपूर्व पाऊस हा गेल्या 64 वर्षांतील सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस (662.2 मी.मी.) असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. तद्नंतर 2006 साली दुसरा सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस (591.9 मी.मी.) कोसळला होता असे हवामान खात्याने म्हटले आहे.
तीन राज्यांना रेड अलर्ट
यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. 2009 नंतर प्रथमच मान्सून केरळमध्ये इतका लवकर दाखल झाला आहे. केरळबरोबर तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरले असून या तिन्ही राज्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दक्षिण कोकण किनाऱ्यावर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. 24 मे रोजी हा पट्टा रत्नागिरीपासून 40 किलोमीटर अंतरावर उत्तर-पश्चिम भागात होता. आता त्याची वाटचाल पूर्वेकडे सुरू झाली आहे.
मुंबई आणि पुण्यात रात्रभरापासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मुंबई आणि परिसरात रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. रेल्वे प्रशासनाने पावसामुळे दिवसाचा कोणताही मेगाब्लॉक घेतला नाही. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास साडे तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात रेड अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. सिंधुदुर्गात चार दिवस सूर्यदर्शन देखील झाले नाही. चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते. सातारा जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ओझर्डे धबधबा वाहू लागला असून आजपर्यंतच्या इतिहासात मे महिन्यात पहिल्यांदाच हा धबधबा प्रवाहित झाला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी
शनिवारी ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. डोंगरावरून ढिगारा पडल्यामुळे हिंदुस्तान-तिबेट रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग-5 बंद झाला.
दिल्लीत वादळासह पाऊस
काल रविवारी सकाळी दिल्लीत वादळासह मुसळधार पाऊस पडला. मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-1 च्या रस्त्यांवर पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे 100 हून अधिक उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्यापैकी 25 हून अधिक उड्डाणे वळवण्यात आली आहेत. काही उड्डाणे उशिरा झाली तर काही रद्द करण्यात आली.
हवामान खात्याने आज देशातील 21 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. याशिवाय, उत्तराखंडमध्ये गारपीट आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ-उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.