मोफत पाणीपुरवठ्याच्या नावाखाली पाणीपट्टीत वाढ ः प्रतिमा कुतिन्हो

0
41

राज्यातील जनतेला मोफत पाणी देण्याच्या योजनेच्या नावाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्षात पाणीपट्टीत दरवाढ केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी काल केला. गोमंतकीय सरासरी १६ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी महिन्याला वापरत असतात. १६ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणार्‍या ग्राहकांना पाणीपट्टीही भरावी लागणार आहे. ती पूर्वीपेक्षा जास्त दराची असेल असे सांगून मोफत पाण्याची घोषणा करणारे सावंत सरकार प्रत्यक्षात गोमंतकीयांच्या माथी वाढीव बिले मारणार असल्याचा आरोप यावेळी कुतिन्हो यांनी केला.

पाण्याच्या ग्राहकांची वेगवेगळी वर्गवारी करण्यात आली असून सर्वात कमी पाणी वापरणार्‍या ग्राहकांना (१६ हजार लिटरपेक्षा कमी पाणी वापरणार्‍या) मोफत बिलांमुळे अत्यल्प असा आर्थिक लाभ होणार आहे, मात्र बहुतेक गोमंतकीयांना सरासरी १६ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी महिन्याभरात लागत असून तंनावरच्या वर्गात घालण्यात आलेले आहे. त्यांना सध्याच्या २.५ प्रति युनिटऐवजी ३.५ रु. प्रती युनिट या दराने बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना मोफत पाणी दूरच उलट वाढीव दराने पाणी घ्यावे लागणार आहे.

जे ग्राहक दिवसाला ५३३ लिटर पाणी वापरतात त्यांना त्यांच्या आताच्या पाणीपट्टीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागणार असल्याचे कुतिन्हो यांनी यावेळी सांगितले.