मोपा-भोम येथे एकाचा धारदार हत्याराने खून

0
112

संक्राळ पत्रादेवी येथील चंद्रकांत बांदेकर (५५) यांचा मृतदेह मोपा भोम येथे मैदानाजवळ काल दि. २ रोजी पोलिसांना सापडला. चंद्रकांत यांच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या खुणा आढळून आल्या असून पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. चंद्रकांत यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी त्यांची ऍक्टिवा (जीए ११ एफ ७१४२) सापडली आहे. चंद्रकांत यांनी हेल्मेट परिधान केले होते. तर त्यांची दुचाकी मृतदेहाशेजारी उभी होती.

घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला आहे. चंद्रकांत हे संक्राळ पत्रादेवी येथी रेती व्यवसाय करत होते. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.