>> राज्य सरकारने मोपा विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी २० महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जीएमआर कंपनीला देण्यात आले होते. मोपा विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पर्यावरण संबंधीच्या याचिकेमुळे अनेक महिने काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे राज्य सरकारला बांधकाम पूर्ण करण्याच्या मुदतीत वाढ करावी लागली आहे. गेल्या १६ जानेवारी २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने विमानतळाच्या कामाला हिरवा कंदील दिला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोपा विमानतळाच्या बांधकामाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता डिसेंबर २०२१ पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानंतर मे २०२२ पर्यंत विमानतळावरून विमानाच्या उड्डाणाला प्रारंभ केला जाऊ शकतो, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
मोपा विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांचा कालावधी परवानगी व साधनसुविधा उभारण्यासाठी लागणार आहे.