मोदी, शहांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

0
160

>> आचारसंहिता उल्लंघन प्रकरण

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत दाखल केलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी होणार असून या सुनावणीकडे तमाम देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा यांच्यावर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. कॉंग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष खासदार सुष्मिता देव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
देव यांनी याचिकेत म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अनेकवेळा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे पुरावे कॉंग्रेस पक्षाने दिले आहेत. हे दोन्ही नेते भडक भाषणे करतात आणि आपल्या भाषणांमधून देशाच्या सैन्याच्या नावाने मते मागतात. निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या सर्व कृत्यांवर प्रतिबंध लादले आहेत. मात्र, प्रतिबंध असून निवडणूक आयोगाचे नियम न पाळता मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा सैन्याच्या नावे मते मागत असल्याचा आरोप याचिकादार खासदार देव यांनी केला आहे.

गेल्या २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे मतदान केल्यानंतर भाजपची रॅली निघाली. ही देखील आचारसंहितेच्या विरोधातील कृती होती, असे खासदार देव यांनी याचिकेत म्हटले आहे. अहमदाबाद येथील मोदींच्या रॅलीची रीतसर तक्रार कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे, पण अद्याप निवडणूक आयोगाने या दोघांवर कारवाई केलेली नाही,’ असे देव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.