लोकसभा निवडणुकीच्या एवढ्या भाऊगर्दीत गोव्यासारख्या छोट्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभा आयोजित करून भारतीय जनता पक्षाने ही येणारी निवडणूक आपण किती गांभीर्याने घेतली आहे हेच दाखवून दिले आहे. ‘अबकी बार चारसौ पार’ ची घोषणा पंतप्रधानांनी दिलेली असल्याने एकेका जागेला आत्यंतिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे गोव्यामध्ये लोकसभेच्या केवळ दोनच जागा जरी असल्या, तरी त्यापैकी उत्तर गोव्याची जागा राखणे आणि दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेणे ह्या दोन्ही गोष्टींना भाजपने अतोनात प्राधान्य दिलेले दिसते. उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सहाव्यांदा निवडणुकीला उभे असले तरी त्यांना जिंकण्याचा ठाम आत्मविश्वास दिसतो. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी रमाकांत खलप हे एकेकाळचे मोठे नाव असले, तरी गेली अनेक वर्षे निवडणुकांपासून दूर राहिले असल्याने आणि ज्या काँग्रेस पक्षात ते सध्या आहेत, त्या पक्षानेही त्यांच्या अनुभवाचा वापर न करता त्यांना आजवर अडगळीतच ठेवल्याने ही निवडणूक आपण सहज जिंकू असे श्रीपाद यांना वाटते. तरीही त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार आहेत, म्हणजेच कोणताही धोका पत्करण्याची यावेळी पक्षाची तयारी नाही.
दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपो यांच्या रूपाने राजकारणापलीकडचा एक नवा चेहरा आणि त्यातही महिला उमेदवार भाजपने यावेळी उतरवून निवडणुकीची समीकरणेच पालटवून टाकली. पल्लवी यांच्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जिवाचे रान करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मगो पक्षानेही त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे आणि मडकई व फोंड्यातून त्यांना मोठी आघाडी मिळवून देण्याचा निर्धार त्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. पल्लवी या राजकारणात नवख्या असल्या आणि सुरवातीला ‘त्यांना कोकणी बोलता येत नाही’ असा अपप्रचार केला गेला, तरी आपल्या साध्या, मनमिळावू वागण्याने आणि संपूर्ण सकारात्मक प्रचाराने त्यांनी या निवडणुकीत प्रतिपक्षासमोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात त्यांचे प्रतिस्पर्धी विरियातो हे स्वतःच्याच बेजबाबदार विधानाने अडचणीत आल्याचे दिसून आले. भारतीय संविधानासंदर्भातील त्यांचे विधान हा एकापरीने त्यांचा स्वयंगोल आहे. ‘गोवा मुक्त झाला तेव्हा भारताचे संविधान गोव्यावर लादले गेले’ हे त्यांनी राहुल गांधींपाशी चार वर्षांपूर्वी केलेले विधान सर्वस्वी अराष्ट्रीय स्वरूपाचे आणि आक्षेपार्ह ठरते. गोमंतकीयांच्या दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाशी मांडताना चार वर्षांपूर्वी आपण हे अराष्ट्रीय विधान केले, हे स्वतःच ते प्रचारसभेत बोलून गेले आणि थेट पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उचलून धरून प्रत्युत्तर देत विरियातोनाच नव्हे, तर त्यांच्या काँग्रेस पक्षालाच ठणकावले आहे. आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याची सारवासारव जरी विरियातो करीत असले, तरी ‘जो बूँदसे गयी वो हौदसे नही आती’ हे त्यांना आता तरी कळायला हवे. ‘भारताने आपले संविधान गोव्यावर लादले’ असे म्हणणे याचाच दुसरा अर्थ ते गोवा हा भारताचा अविभाज्य भाग मानत नाहीत असा होतो. गोंयकारपणाच्या नावाखाली कोणी जर असे पोर्तुगीजधार्जिणेपणाचे समर्थन करीत असेल तर त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. विरियातोंच्या आक्षेपार्ह विधानाची दखल थेट पंतप्रधान मोदींनी छत्तीसगढमधील सभेत घेतली, ह्यावरून भाजपची प्रचारयंत्रणा किती कार्यक्षम आहे ह्याची चुणूक दिसली आहे. भाजप केवळ प्रत्युत्तर देऊन थांबणार नाही. विरियातो यांना निवडणूक लढवण्यापासून रोखावे असे साकडे निवडणूक आयोगाला घातले गेले आहे. त्यांच्यावर खटलेही भरले जाऊ शकतात. आज मोदी स्वतः गोव्यात येत आहेत. आज संध्याकाळी ते विरियातो आणि त्यांच्या काँग्रेस पक्षावर कोणती तोफ डागणार हे पाहावे लागेल. पंतप्रधानांच्या सभेमुळे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिक मतदान होईल असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे व तो अनाठायी ठरू नये यासाठी ते आणि भाजपचे आमदार प्रचंड मेहनत घेत आहेत. मोदींचा झंझावात दक्षिण गोव्याची जागा ह्यावेळी काँग्रेसकडून खेचून घेण्यास उपकारक ठरेल असे त्यांना ठामपणे वाटते. आपल्या मडगावच्या मागच्या सभेत दक्षिण गोव्याच्या अनेक प्रश्नांना पंतप्रधानांनी स्पर्श केला होता. विशेषतः अल्पसंख्यक समुदायाला पक्षाकडे आकृष्ट करण्यावर आणि त्यांना ‘सबका साथ, सबका विकास’ ची ग्वाही देण्यावर त्यांचा भर होता. आजच्या सभेत ते काय बोलणार, कोणाला कसे शिंगावर घेणार ह्याबाबत म्हणूनच मोठी उत्सुकता आहे!