मोदींच्या वाढदिनी देशपातळीवर विक्रमी लसीकरण

0
49

>> एकाच दिवसात २ कोटींच्यावर दिली लस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काल ७१ व्या वाढदिवसानिमित्त देशपातळीवर विक्रमी लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहीमेअंतर्गत काल एकाच दिवसात लसीकरणाचा आकडा दोन कोटींच्यावर पोहोचला होता. काल दिवसभरात एकूण २ कोटी २२ लाख २८ हजार ६७५ नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वी २७ ऑगस्टला १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० नागरिकांना लशीचे डोस दिले गेले होते. ३१ ऑगस्टला १,३३,१८,७१८ जणांना लस देण्यात आली होती.

६ सप्टेंबरला १,१३,५३,५७१ जणांना डोस देण्यात आले होते. जास्तीत जास्त लसीकरण करून पंतप्रधानांचा वाढदिवस विशेष बनवण्याची सरकारची योजना होती. केंद्र राज्यांना आवश्यक असलेल्या लशींचा पुरवठा करण्यास सक्षम आहे. या महिन्याच्या अखेरीस कोरोनावरील डीएनए लशीचे १ कोटी डोस मिळतील. या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये, कोविशील्डच्या २० कोटी डोसचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात, कोविशील्डने १९ कोटी डोस दिले गेले होते. तर कोवॅक्सिनचे या महिन्यात ३.२५ कोटी डोस उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिली.

देशातील सर्व नागरिकांसाठी कोविड -१९ ची लस मोफत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. ज्या नागरिकांनी अजूनही लस घेतलेली नाही त्यांनी लस घेऊन पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे.

कोविड योद्ध्यांशी आज
पंतप्रधान मोदींचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी सकाळी १०.३० वाजता कोविड लस लाभार्थींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांचा ऑनलाईन संवाद गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य व्याख्यान सभागृह, रवींद्र भवन, मडगांव, सांगे मुनसीपाल सभागृह, राजीव कला मंदीर, फोंडा, म्युनिसिपल सभागृह सांखळी, जुने अझिलो हॉस्पिटल सभागृह म्हापसा तसेच सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये थेट दाखविला जाईल.

लस न घेतलेल्यांनी फुकाचा सल्ला देऊ नये
गोवा राज्यात पहिला डोस घेण्यासाठी लोकांनी पूर्ण सहकार्य दिले आहे. आता दुसरा डोस पूर्ण करण्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभत आहे. मात्र ज्यांनी एकही डोस घेतला नाही ते राजकीय नेते सरकारवर टीका करतात याचे आश्‍चर्य वाटत असून अशा लोकांनी तत्वज्ञान सांगू नये अशी टीका मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर केली.

कोविडचा जर पराभव करायचा असेल तर सर्वांना कोविड प्रतिबंधक लस टोचून घ्यावी लागेल, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. लस टोचून न घेणार्‍यांच्या जीवाला धोका असून प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे त्याला अपवाद असू शकत नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडवरील लशीविषयी आपल्या मनात काही शंका असून त्यामुळे आपण लशीचा एकही डोस घेतला नसल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. तसेच चोडणकर यांनी लसीकरणाच्याबाबतीत तरी राजकारण करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

सगळ्या जगाने कोविडवरील लशीला मान्यता दिलेली असताना चोडणकर यांच्या मनात या लशीविषयी शंका का आहे, असा प्रश्‍नही सावंत यांनी केला. नकारात्मक विचार व भावना बाजूला ठेवून चोडणकर यांनी पुढे येऊन लस टोचून घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना केली.

राज्यातील लशीसाठी पात्र असलेल्या सर्व लोकांचे लसीकरण झाले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केल्यानंतर गेल्या गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी शंभर टक्के लसीकरणाचा मुख्यमंत्र्याचा दावा खोटा असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर या लशीविषयी आपल्या मनात काही शंका असल्याने आपण व आपल्या कुटुंबीयांनी लशीचा एकही डोस घेतला नसल्याचे सांगितले होते.

गोव्यात १७,३२७ जणांचे लसीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल शुक्रवारी दिवसभरात गोव्यात १७,३२७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यातील २८७५ जणांना लशीचा पहिला डोस तर तब्बल १४४५२ जणांना लशीचा दुसरा डोस देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल दि. १७ सप्टेंबर रोजी राज्यातील २५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले होते.