मोदींचा संवाद

0
42

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता गोव्यातील आरोग्य सेवा कर्मचारी आणि लस लाभार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. सर्वच्या सर्व शंभर टक्के जनतेचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा राज्य सरकारने केलेला असल्याने त्या अनुषंगाने राज्यातील जनतेचे अभिनंदन करणे आणि त्यांना धन्यवाद देणे यासाठी पंतप्रधान हा थेट संवाद साधणार आहेत. वस्तुतः राज्यातील असंख्य लोकांनी अजूनही लशीचा पहिला डोसही घेतलेला नाही, परंतु सरकारी आकडेवारीत शंभर नव्हे, एकशे दोन टक्के लसीकरण झाल्याचे दिसत असल्याने त्याचा अशा प्रकारे ‘उत्सव’ साजरा करणे हे ओघाने आलेच, कारण राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पंतप्रधानांच्या अशा प्रकारच्या जनतेशी थेट संबोधनाचा राजकीय फायदा निश्‍चितच राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे आजच्या पंतप्रधानांच्या संवादाकडे नाही म्हटले तरी ह्या राजकीय परिप्रेक्ष्यातूनच पाहावे लागते.
तसे पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोवा यांचे एक विशेष नाते आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित करण्याची जोरदार मागणी होत असूनही लालकृष्ण अडवाणींसह काही ज्येष्ठ नेत्यांचा त्याला विरोध असल्याने ते घोडे बराच काळ अडले होते. मोदींच्या नावाबाबत झालेली ही कोंडी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फोडली. अडवाणींना ‘मुरलेले लोणचे’ संबोधत अप्रत्यक्ष शरसंधान करीत नव्या चेहर्‍याची गरज पर्रीकरांनी जाहीरपणे तेव्हा व्यक्त केली. गोव्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला अनुपस्थित राहून ज्येष्ठ नेत्यांनी आपला मोदीविरोध कृतीद्वारे दाखवून दिला, परंतु तरीही पर्रीकरांनी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत मोदींचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मोदींची त्या निवडणुकीसाठी आधी पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून घोषणा गोव्यातूनच झाली आणि नंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्यातही गोव्याच्या बैठकीचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच मोदींच्या मनामध्ये गोव्याविषयी एक वेगळे ममत्व आहे. गोव्याविषयीच्या आपल्या भावना ते वेळोवेळी व्यक्त करीत असतात.
गेल्या सात वर्षांच्या आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात मोदींनी गोव्याच्या सर्व मागण्यांकडे सहानुभूतीने पाहिले आणि वेळोवेळी विशेष पॅकेजही गोव्याला बहाल केलेले आहे. त्यामुळे आजच्या ह्या संवादाला पंतप्रधानांच्या गोव्याशी असलेल्या त्या नात्याचा संदर्भ जरूर आहे. अर्थात, मोदींनी गोव्यासंदर्भात दिलेल्या काही महत्त्वाच्या आश्वासनांची अजूनही पूर्ती झालेली नाही किंवा केलेल्या काही घोषणा पुढे विवादित ठरल्या हेही तितकेच खरे आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच मोदींची गोव्यात जी भव्य विजयसंकल्प रॅली झाली होती, त्यात त्यांनी केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यास घटनेच्या कलम ३७१ खाली गोव्याला खास दर्जा देण्याच्या मागणीचा विचार करू असे जाहीर आश्वासन दिले होते. राज्याचा खाण प्रश्न काही महिन्यांत सोडवण्याचेही अभिवचनही त्यांनी दिले होते. ह्या दोन्ही गोष्टी अजूनही पूर्णत्वाला गेलेल्या नाहीत. विशेष दर्जाची मागणी तर निकालीच काढली गेली आहे. गोवा कला अकादमीतून अटल सेतूचे कोनशिला अनावरण करताना मोदींनी गोव्याला सागरमाला प्रकल्पाचा लाभ देण्याची ग्वाही दिली होती, परंतु ‘सागरमाला’ च्या नेमक्या उद्दिष्टांबाबत विरोधकांकडून साशंकता व्यक्त झाल्याने तो प्रकल्पच वादाच्या भोवर्‍यात सापडला. तरीही गोव्यातील आपल्या पक्षाच्या सरकारप्रती मोदींकडून नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली गेली आहे हे नाकबूल करता येणार नाही. मनोहर पर्रीकर यांच्या कार्याविषयी मोदींना प्रचंड आपुलकी होती. त्यांचे उत्तराधिकारी प्रमोद सावंत यांच्यावरही त्यांचा आजवर आशीर्वाद राहिलेला आहे. त्यामुळेच शंभर टक्के लसीकरणाचा दावा करणार्‍या त्यांच्या सरकारचे कौतुक करण्यात त्यांनी शब्द आखडते घेतले नाहीत आणि आज ज्यांच्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाले त्या सर्वांचे अभिनंदन करण्याचे औचित्य ते साधणार आहेत. हा सारा ‘इव्हेंट’ त्यामध्ये संपूर्ण सरकारी यंत्रणा गुंतलेली असल्याने व्यवस्थित पार पडेल यात शंका नाही, परंतु खरी गरज आहे ती खरोखरीचे लसीकरण शंभर टक्के होण्याची. सध्या सुरू असलेल्या टीका उत्सव ३.२ मधून संपूर्ण लसीकरण पूर्ण करून दाखवणे ही राज्य सरकारची जबाबदारी ठरते. पंतप्रधानांकडून कौतुक जरूर करून घ्या, परंतु आपल्यावरील जबाबदारीही विसरू नका. आज कौतुक करणारे मोदीजी उद्या कान उपटायलाही कमी करणार नाहीत!