मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी सरकारकडून खास कर्मचारी नियुक्त

0
29

>> पणजी महानगरपालिका आणि 13 नगरपालिका क्षेत्रात मोकाट गुरे आढळल्यास फोनवरून कर्मचाऱ्यांकडे नोंदवता येणार तक्रार

राज्य सरकारने पणजी महानगरपालिका आणि 13 नगरपालिकांमधील मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले असून, पणजी मनपा किंवा अन्य पालिका क्षेत्रात कुठेही मोकाट गुरे आढळल्यास त्याची तक्रार सदर कर्मचाऱ्यांकडे फोनवरून संपर्क साधून करता येणार आहे. त्यानंतर हे कर्मचारी पुढील कार्यवाही करणार आहेत.

राज्यात शेतीचे प्रमाण कमी होत चालले असून, मोकाट गुरांचे प्रमाण वाढत चालले आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये गुरांचा वापर कमी झाला आहे. परिणामी ही गुरे मोकाट सोडून दिली जात असल्याने त्यांचा वावर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाढला आहे. या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच, शिवाय अपघाताच्या घटना देखील घडतात. दिवसा खाद्याच्या शोधात सर्वत्र भटकणारी ही गुरे रात्री रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. ही गुरे चटकन वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नसल्याने अपघात घडतात. प्रसंगी गुरांचा आणि काही घटनांमध्ये वाहनचालकांनाही आपला प्राण गमवावा लागतो. मधल्या काळात कोंडवाडे, दंड असे उपाय करूनही ही मोकाट गुरांची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर सरकारने नवा उपाय आखला आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने नागरी स्वराज्य संस्थांमधील मोकाट जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि भटक्या गुरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पणजी महानगरपालिका, मडगाव, मुरगाव, म्हापसा, कुडचडे-काकोडा, कुंकळ्ळी, फोंडा, केपे, डिचोली, सांगे, पेडणे, वाळपई, काणकोण आणि साखळी नगरपालिकेत नियुक्त कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. नागरिकांना मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्या गुरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी स्थानिक नगरपालिकेकडे देण्यात आली आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून मोकाट गुरांबाबत माहिती मिळाल्यानंतर पुढील आवश्यक कृती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.