आंध्र प्रदेशमधील वोल्वो बसच्या भीषण अग्निकांडाने गोव्यातून आंतरराज्य मार्गांवर वाहतूक करणार्या अशाच प्रकारच्या आरामगाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आणला आहे. गोव्याहून बेंगलुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई आणि अन्यत्र रोज असंख्य आंतरराज्य आरामगाड्या धावतात. यापैकी बहुसंख्य बसगाड्या परराज्यांमध्ये नोंदणी केलेल्या असतात आणि ट्रॅव्हल एजंट भाडेपट्टीवर त्या चालवतात. हजारो प्रवासी त्यातून ये – जा करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षेचा विचारही कधी वाहतूक खात्याकडून गांभीर्याने झालेला दिसत नाही. बसच्या मूळ आराखड्यात आरामदायक सुखसुविधांच्या नावाखाली मनमानीपणे बदल केले गेलेले सर्रास पाहायला मिळतात. या बसगाड्यांच्या आसनांमध्ये किती अंतर असायला हवे याचे दंडक आहेत, परंतु त्यांची कोणतीही फिकीर न बाळगता दाटीवाटीने आसने बसवली जातात. कित्येक तासांच्या प्रदीर्घ प्रवासात मग बस प्रवाशांचे हाल झाले तरी बसमालकांचे त्याच्याशी काहीही देणेघेणे नसते. बस स्लीपर कोच असेल तर मग बघायलाच नको.
प्रवाशांना अत्यंत गैरसोयीची ठरतील अशी अल्पस्वल्प जागेतील ही आसने म्हणजे तर एखाद्या अपघातप्रसंगी मृत्यूचा जबडाच ठरत असतो. अशा स्लीपर कोचमधील वातानुकूलन यंत्रणेचा तर आनंदीआनंदच असतो. व्हिडिओ कोच ही तर मोठी डोकेदुखी. आता अलीकडे तर अशा आरामबसमध्ये एक व्हिडिओ पुरत नाही म्हणून टप्प्याटप्प्यावर एलसीडी बसवलेले असतात. प्रत्येक आसनावर दिवे व व्हिडिओचा आवाज नियंत्रित करणारी बटणे जरूर असतात, परंतु अनेकदा प्रवाशांना ती वापरता येऊ नयेत यासाठी चालकाच्या केबिनमधूनच त्यांचे नियंत्रण केले जाते. त्यामुळे बसप्रवास ही डोकेदुखी मानून बहुतेक प्रवासी अलीकडे रेल्वेचाच पर्याय स्वीकारताना दिसतात. मात्र, तातडीने आंतरराज्य प्रवास करायचा असेल तर सामान्यजनांना बसशिवाय पर्याय नसतो. बसमधील आरामदायक सुविधांमध्ये कमी जास्तपणा असेल तर तो एकवेळ सहन करता येतो, परंतु सुरक्षेसंबंधी जर टाळाटाळ केलेली असेल तर ती जिवावर बेतण्याची भीती असते. बसमध्ये किमान तीन आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग असणे अपेक्षित असते, परंतु हे मार्ग उघडले जाऊ शकतात की नाही हे कधीही तपासले गेलेले नसते. बसचे पासिंग करणारे वाहतूक खात्याचे अधिकारीही चिरीमिरी घेऊन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम एखाद्या अपघातावेळी प्रवाशांना भोगावा लागतो. आंध्र प्रदेशमधील प्रस्तुत बस अपघातावेळी जेव्हा डिझेलच्या टाकीचा भडका उडून बसला एकाएकी आग लागली, तेव्हा प्रवाशांना हे आपत्कालीन मार्ग उघडताच आले नाहीत. त्यामुळे केवळ चार पाच प्रवासी कसाबसा आपला जीव वाचवू शकले. बाकीच्यांची होरपळून राखरांगोळी झाली. गोव्यात ये – जा करणार्या वोल्वो, मर्सिडिज बेंझ आणि तत्सम आरामगाड्यांची काटेकोर तपासणी हाती घेतली, तर बहुतेक बसगाड्यांमध्ये सुरक्षा नियमांची सर्रास पायमल्ली केलेली दिसेल. या बसगाड्या प्रवासी वाहतुकीसाठी आहेत, परंतु सरकारचा कोट्यवधींचा महसुल बुडवून त्या बसच्या टॉपवरून आणि डिकीमधून अनेक व्यावसायिक आपला हरतर्हेचा माल बिनदिक्कतपणे आणतात. मुंबईसारख्या ठिकाणी तर प्रवाशांना वेठीला धरून तासन्तास हा माल बसमध्ये चढवला जातो. कोणीही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. अलीकडे तर बसमधून गैरगोष्टींची तस्करी सर्रास सुरू झाली आहे. दारूच्या बाटल्या गोव्यातून बाहेर नेणे हे तर नेहमीचेच आहे, वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू आहे. क्वचित एखाद्या वेळी छाप्याचा देखावा होतो, परंतु तपासणी नाक्यांवरील कर्मचार्यांच्या कृपेने हा व्यवसाय सुखेनैव चाललेला आहे. अलीकडेच इन्सुली नाक्यावर तपासणीत एका बसचालकापाशी विदेशी चलनाचे घबाड मिळाले. बसवाहतूक ही प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आहे की अशा प्रकारच्या गैरधंद्यांसाठी हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. वर वर पाहता या सार्या गोष्टी आता नेहमीच्याच झालेल्या असल्याने प्रवाशांनाही त्यात काही वावगे वाटेनासे झालेले आहे. परंतु प्रवाशांच्या सुरक्षेकडे असा कानाडोळा दुर्घटनेच्या प्रसंगी असंख्य निष्पाप प्रवाशांचे प्राण घेऊन जातो. रात्रीबेरात्री घडणारे हे अपघात समूळ टाळणे शक्य नसेल, परंतु निदान त्यांची भीषणता तरी योग्य त्या सुरक्षात्मक उपाययोजनांद्वारे आपण टाळू शकू!