मृग नक्षत्राला केरळात मान्सून दाखल

0
8

सात दिवस उशिराने आगमन; येत्या 4 ते 5 दिवसांत गोव्यात दाखल होणार; उद्या, परवा राज्यात पावसाच्या सरी शक्य

अखेर नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा संपली असून, सात दिवस उशिराने काल केरळमध्ये मान्सून दाखल झाला. भारतीय हवामान विभागाकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आली. मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सूनने केरळमध्ये धडक दिली. दिवसभरात केरळात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल वातावरण राहिल्यास गोव्यात येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता केली जात आहे. केरळात मान्सून दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरीही सुखावला आहे.

केरळमध्ये दरवर्षी 1 जूनला मान्सूनचे आगमन होते. यावर्षी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचे आगमन सात दिवस उशिराने झाले. हवामान विभागाने केरळमध्ये यंदा 4 जूनला मोसमी पाऊस दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता; मात्र पोषक वातावरण नसल्याने चार दिवस उशिराने केरळमध्ये मान्सून दाखल झाला. तसेच, बिपरजॉय चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांची प्रगती संथ गतीने सुरू होती.

भारतीय हवामान विभागाने काल जाहीर केले की, नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागात आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडूचा बहुतांश भाग, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारचे आखात, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे.

नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकचा काही भाग, ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, पूर्वोत्तर राज्यांतील काही भागात पुढे सरकण्यासाठी येत्या 48 तासांत परिस्थिती अनुकूल आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस अनुकूल वातावरण राहिल्यास साधारण 4 ते 5 दिवसांत मान्सून गोव्यात दाखल होतो.

दरम्यान, राज्यातील तापमानात वाढ कायम असून, नागरिक वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. राज्यातील कमाल तापमानात 3.8 अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात 1.9 अंश सेल्सिअसने वाढ नोंद झाली. चोवीस तासांत कमाल तापमान 35.8 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27.2 अंश सेल्सिअस नोंद झाले. येत्या 9 व 10 रोजी काही भागात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

‘बिपरजॉय’ची तीव्रता वाढणार
बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होऊन उत्तर-वायव्य दिशेने सरकणार आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गेल्या 6 तासांमध्ये 5 किलोमीटर प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकले आहे. हे चक्रीवादळ गोव्यापासून पश्चिम-नैऋत्येस सुमारे 850 किमी अंतरावर आहे. तसेच पुढील 24 तासांत ते हळूहळू आणखी तीव्र होईल आणि पुढील 3 दिवसांत जवळजवळ उत्तर-वायव्य दिशेने सरकेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

चक्रीवादळामुळे समुद्र खवळणार
राज्यातील विविध भागांत जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकातील समुद्र खवळलेला राहील. तसेच समुद्रात उच्च लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.