मूत्रल आजार ः आहार-विहार

0
394
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज- पणजी)

अगदी महत्त्वाचे व आवश्यक काम असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे.
पातळ व सुती कपडे घालावेत. पांढर्‍या किंवा फिक्या रंगाचे खिडक्यावर वाळ्याचे पडदे लावून, पाणी शिंपडून थंडावा निर्माण करावा. घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.

उन्हाळ्याची सुरूवात झाली. सुर्यदेवता अधुनमधून जरा जास्तच क्रोधायमान दिसते. उग्र रूप धारण करुन सर्वत्र तप्त वातावरणही निर्माण करत आहे. या वातावरणाचा परिणाम झाडे, इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्यावरही होतो. थकणे, जास्त तहान लागणे, अंगाचा दाह होणे, घाम जास्त येणे, त्वचेवर पुटकुळ्या (रॅश) उठणे, लघवीला त्रास होणे असे विविध आजार उन्हाळा निर्माण करतो. त्यातही मूत्रसंस्थानचे आजार जास्त सतावतात. लघवीला जळजळ, लघवी थेंब थेंब पुन्हा- पुन्हा व्हायला लागली किंवा साधारण कंबर, ओटीपोटी असे दुखू लागले म्हणजे बरेज जण स्वत:च डॉक्टर होतात व प्रथम ‘साइटल’सारखे औषध आणून घेतात व त्यात काहींना बरेही वाटते. काहींचा मात्र आजार बळावतो. व मग डॉक्टरांचा सल्ला घेण्यास येतात. मुळात लघवीचा त्रास (युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन- यु.टी.आय.) होऊ नये म्हणून प्रथमच काळजी घेतली तर?
उन्हाळ्यात किंवा गरम वातावरणात अधिक प्रमाणात व्यायाम केल्यास, तीक्ष्ण व रुक्ष औषधांचे सेवन केल्यास, मद्य सेवन केल्यास, वेगवान घोड्यावर बसणे म्हणजेच आत्ताच्या काळात सतत दुचाकीवर प्रवास केल्यास, अतिप्रमाणात मासे खाल्ल्यास तसेच खाल्लेले अन्न पचण्यापूर्वीच परत जेवणे-खाणे इ.मुळे विविध प्रकारचे मूत्रसंस्थानाचे आजार होतात. शरीरातील वात, पित्त व कफदोष स्वकारणांनी प्रकुपित होऊन सर्व दोष एकत्रित दूषित होऊन बस्तिप्रदेशी विकृती किंवा अवरोध उत्पन्न होतो व मूत्राच्या मार्गामध्ये पीडा होते. मनुष्याला मूत्रविसर्जनाच्यावेळी त्रास होतो. यालाच मूत्रकृच्छ किंवा यु.टी.आय.असे म्हटले जाते.

उन्हाळा सुरू होताच हा युटीआयचा त्रास आपण सहज साध्या उपायाने दूर करु शकतो. तसेच हा त्रास होऊ नये म्हणून काळजीही घेऊ शकतो.

  • लघवी अडकणे किंवा लघवीला आग होणे अशा तक्रारी असल्यास धने पावडर काही वेळ पाण्यात भिजवून खडीसाखर घालून प्यावे.
  • दुर्वांचा रस पोटात घेण्याने फायदा होतो.
  • शीतल पाण्याने परिसेवन करावे
  • थंड पाण्याने अवगाहन (स्नान) करावे.
  • मृदु विरेचन तसेच बस्तिचाही प्रयोग वैद्याच्या सल्ल्याने करावा.
  • विदारीकंद किंवा ऊसाच्या रसाचे सेवन करावे.
  • शतावरी, काश, कुश, गोक्षुर, विदारीकंद, शालीमूळ, ऊसाचे मूळ ही द्रव्ये समभाग घेऊन क्वाथ (काढा) बनवावा व मध किंवा साखर घालून सेवन करावे.
  • श्‍वेतकमल व नीलकमलच्या फुलांचा काढा प्यावा.
  • सिंगाड्याचा काढा प्यावा.
  • विदारीकन्दाचा काढा, साखर किंवा मध मिसळून सेवन करावा.
  • काकडीच्या बिया, ज्येष्ठमध व देवदारू यांचे समभाग चूर्ण तांदळाच्या धुवणाबरोबर सेवन केल्यास लाभ मिळतो.
    वरील उपाय मूत्रल दोष उत्पन्न झाल्यास वैद्याच्या सल्ल्यानेच करावेत.
    पण मूत्रल दोष उत्पन्न होऊ नये म्हणून आपण घरच्या घरी आपल्या आहारात व आचरणात काही बदल करण्याची सध्या गरज आहे.
  • मधुर म्हणजे चवीला गोड, थंड व स्निग्ध अन्नपान सेवन करावे. खारट, आंबट, कडू व उष्ण अन्नपदार्थ वर्ज्य करावेत.
  • व्यायामही फारसा करु नये.
    आहार असा असावा….
  • दूध तसेच घरचे ताजे लोणी व तूप यांचे रोज सेवन करावे.
  • मुख्य जेवणात तांदूळ, ज्वारी, गहू यांपासून तयार केलेला भात, भाकरी, पोळी खावी.
  • डाळी व कडधान्यांपैकी मूग, तूर दररोज तर मसूर, मटकी अधून-मधून वापरावी.
  • भाज्यांमध्ये दुधी, बटाटा, पडवळ, भेंडी, दोडका, घोसाळी, पालक, कोहळा, काकडी या भाज्या नित्य वापराव्यात.
  • स्वयंपाक करताना जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, हळद, कोकम, वेलची, आले अशा मसाल्यांचा वापर करावा.
  • रोजच्या जेवणात काकडीचे काप किंचिंत मिठ भुरभुरून खावे.
  • द्राक्षे, कलिंगड, खरबूज यांचा भरपूर वापर करावा. फळांपैकी द्राक्षे सर्वोत्तम समजावीत.
  • याखेरीज शिंगाडा, गोड संत्री, मोसंबी, नारळ अशी फळे खावीत.
  • सुक्या मेव्यापैकी मनुका, खारीक, रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खावेत.
  • तांदळाची खीर, रव्याची खीर, गव्हाचा शिरा, दुधी हलवा, रव्याचा दूध टाकून केलेला शिरा-लापशी, नारळाची बर्फी, कोहळ्याचा पेठा, साखरभात अशा गोड गोष्टींचे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा सेवन करावे.
  • शहाळ्याचे पाणी पिणे अत्यंत लाभदायक ठरते.
  • सरबत हा प्रकारही शरीर व मनाला तृप्त करतो.
  • चहा, कॉफीचे प्रमाण कमी करुन त्याऐवजी कोकम, लिंबू यांचे साखर, जिर्‍याची पूड टाकून तयार केलेले चविष्ट सरबत प्यावे.
  • कैरीचे पन्हे शरीर व मन प्रसन्न करते.
  • प्यावयाचे पाणी सकाळी उकळून घ्यावे व माठामध्ये भरून ठेवावे. माठामध्ये चंदन, वाळा तसेच मोगर्‍याची ताजी फुले टाकावीत आणि सुगंधी व थंड झालेले पाणी प्यावे.
    आचरण कसे असावे …
  • अगदी महत्त्वाचे व आवश्यक काम असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे.
  • पातळ व सुती कपडे घालावेत. पांढर्‍या किंवा फिक्या रंगाचे खिडक्यावर वाळ्याचे पडदे लावून, पाणी शिंपडून थंडावा निर्माण करावा.
  • घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.
  • अंगाला चंदन, वाळा अशा शीत द्रव्यांचे चूर्ण लावावे.
  • सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे व सायंकाळी हिरवीगार झाडी असलेल्या बगीच्यात फिरायला अवश्य जावे.
  • रात्री जागरण करु नये.
    कोणता आहार वर्ज्य समजावा …
  • तिखट, रूक्ष व खूप गरम गोष्टी खाऊ नयेत.
  • दही, लस्सी वर्ज्य समजावी.
  • मका, नाचणी, जव अशी रूक्ष धान्ये वापरू नयेत.
  • ढोबळी मिरची, कारले, मेथी या भाज्या वापरू नयेत.
  • पचायला जड आणि शरीरात वात वाढवणारे मटर, पावटा, चवळी, हरभरा, छोले, वाल अशी कडधान्ये टाळावीत.
  • लसुन गरम असल्याने कमीत कमी वापरावा.
  • हिंग, मोहरी, ओवा, तीळ, लाल मिरची असे तीक्ष्ण मसाल्याचे पदार्थ वापरू नयेत.
  • चिंच, अननस, कच्चे टोमॅटो ही आंबट फळे खाऊ नयेत.
    लघवीचा त्रास किंवा इतर उन्हाळ्यातील त्रासांसाठी रातांबे, काकडी, कैरी, लिंबू, कोहळा, शहाळे, कलिंगड ही फळे खूपच उपयुक्त आहेत.
  • रातांबे पाण्यात कुस्करून त्यात जिरे, मीठ, साखर टाकून केलेले सरबत लघवीला होणारी जळजळ कमी करते.
  • काकडी कापून मीठ लावून खावी किंवा कोशिंबीर खावी.
    कमी होणार्‍या लघवीसाठी काकडी उपयोगी ठरते.
  • कलिंगड शीतकारक, पित्तहारक, मधूर व मूत्रल आहे.