काल रविवारी मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले. राजधानी पणजी शहरात काल दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हवामान खात्याने काल रविवारी राज्याला लाल रंगाचा इशारा दिला होता. तर आज सोमवारीही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून आजही राज्याला अतिपावसाचा लाल रंगाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आज इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
पावसाबरोबरच आज राज्यात ताशी 55 ते 66 कि.मी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केलेली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
दरम्यान, जोरदार पाऊस व वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल कांसावली-वेळसांव येथे एका धावत्या चारचाकी गाडीवर एक मोठा वडाचे झाड उन्मळून पडण्याची घटना घडली. या दुर्घटनेत चारचाकी गाडीची पूर्णपणे मोडतोड झालेली असली तरी गाडीचालक व गाडीत असलेल्या अन्य एक प्रवाशी असे दोघेही या अपघातातून सुदैवाने बचावले.
आज अतिमुसळधार पाऊस
दरम्यान, आज सोमवारीही राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून जोरदार पावसामुळे रस्ते पाण्याखाली जाणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वृक्ष उन्मळून पडले, जुनी व विशेष करून मातीची घरे कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त केलेली असून लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे. किनारपट्टी भागांत राहणाऱ्या लोकांनी तसेच मच्छिमारांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही हवामान खात्याने दिलेला असून छोट्या-मोठ्या बोटी घेऊन समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये व सतर्क रहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच जलक्रीडांवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी, अशी सूचनाही हवामान खात्याने केली आहे. हवामान खात्याने राज्याला उद्या 16 रोजी केशरी रंगाचा तर परवा 17 व 18 रोजी पिवळ्या रंगाचा इशारा दिला आहे.