मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री कवळेकर तातडीने दिल्लीला रवाना

0
59

>> प्रलंबित सरकारी कामांवर होणार चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तातडीने नवी दिल्ली काल रवाना झाले आहे. राज्यातील विविध प्रलंबित सरकारी कामांवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हेही नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील विविध प्रकारच्या रस्त्यांच्या बांधकाम व इतर विषयांवर चर्चा करणार आहेत. तसेच, जुवारी पुलाच्या विषयावरही चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नावर चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या विषयावर चर्चा करून रणनीती तयार करणार आहेत. राज्यात सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत विधानसभा निवडणुकीची रणनीती चर्चा करण्याची शक्यता आहे. राज्य आर्थिक संकटातून जात आहे. सातत्याने रोखे विक्री करून कर्ज घेतले जात आहे. राज्यातील लाडली लक्ष्मी योजनेचे मानधन मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. निवडणूक जवळ आल्याने लाडली लक्ष्मीच्या लाभार्थी महिला व बाल कल्याण कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. गृहआधार तसेच सरकारी योजनांच्या काही लाभार्थींचे मानधन प्रलंबित आहे. केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत काल दिल्लीला मंत्री मिलिंद नाईक, सभापती राजेश पाटणेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर हेही रवाना झाले आहेत.