मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती देणार

0
29

>> एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट; बंडखोरांची भेट घेतल्यानंतर मुंबईला रवाना

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आपण गती देणार असल्याचे महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधिमंडळामध्ये आम्ही शिवसेना म्हणूनच काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेल्या एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या समर्थक शिवसेना आमदारांची भेट घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील शुक्रवारी सकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.

गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केलेल्या एकनाथ शिंदे यांचे शुक्रवारी पहाटे गोव्यात आगमन झाले. गोव्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांबरोबर वेळ घालवला. त्यांच्याबरोबर शिवसेनेतून ङ्गुटून आलेल्या या समर्थक आमदारांमुळेच त्यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.

बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्व व शिकवण याची जपणूक करून तो वारसा पुढे नेण्याचे कार्य आम्ही करू. कर्जाच्या खाईत बुडाल्याने संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदतीचा हात देणार असून, शेतकर्‍यांसाठी विविध योजना सुरू करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

सध्या गोव्यात असलेले शिवसेनेचे उर्वरित बंडखोर आमदार हे शनिवारी मुंबईला जाणार आहेत. रविवारी मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ४ जुलै रोजी बहुमत सिद्ध करणार आहेत.