मी आई… म्हादई…

0
416
  • पौर्णिमा केरकर

अलीकडे मला भीती वाटायला लागलीय… मला भास होताहेत… स्वप्ने पडत आहेत की माझा अंत जवळ आला आहे. मला भीती वाटते ती माझं सर्वस्व संपून जाण्याची नाही तर ती हीच की ‘माझा पान्हा प्राशून वाढलेल्या आणि माझ्यावरच अवलंबून असलेल्या समस्त जीवसृष्टीची!’

काळ अनंत आहे तसेच ज्ञानही अनंत आहे. याही पलीकडे माझे अस्तित्व युगान् युगांपासून या धरित्रीवर आहे. ते अनादी… अनंत असून भारतीय संस्कृती फळली, फुलली, ती प्रवाहित राहिली माझ्याच काठाकाठाने! वर्षांची तर गणतीच करता येणार नाही की कधीकाळापासून मी अविरतपणे विविध रूपांत धावत आहे. जेव्हा गंगा अस्तित्वात नव्हती त्याही पूर्वीपासून मी खळाळत वाहात आहे. होय मी म्हादई माता… माता याचसाठी की तुम्हीच, माझ्या भूमिपुत्रांनीच हे मातृत्व मला प्रदान केले आहे. आणि मीही ते एखाद्या मौल्यवान दागिन्यासारखे आजपर्यंत माझ्या शरीर-मनावर घेऊन मिरवत आलेली आहे. या दागिन्याचे कधी मला ओझे झाले नाही… कारण त्यात आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सेवा, त्याग… एकूणच मातेसाठी सर्वस्व पणाला लावण्याची ऊर्मी होती. मातेला कधी आपल्या बाळाचं ओझं होईल का? मलाही ते तसं कधी झालंच नाही. माझ्याच काठाकाठाने जीवसृष्टी… निसर्ग… मानवी समूह वाढत गेला. संस्कृतीचा जन्म ही तर मोठी देणगी.

मी मुक्त होते. कधी उंच कड्यावरून तर कधी हळूवार नजाकतीने, तर कधी नुसतीच मुरडत-ठुमकत, वेडीवाकडी वळणे घेत घेत माझा प्रवास चालूच होता. ‘देगाव’ कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यातील एक दुर्गम पण तेवढाच निसर्गसंपन्न गाव. जैविक संपत्तीचे आगार. याच हिरव्या चैतन्याच्या कुशी-मुशीतून मी नितळ-निरंतर वाहात राहिले. मानवी जीवनाला सुंदर करायचं… सभोवतालच्या नैसर्गिक वैभवाला सजीवंत ठेवायचं… प्राण्यांना, सजीवतेला अपरंपार प्रेमपान्हा पुरवायचा हेच तर माझं स्वप्न होतं. आणि त्यावेळच्या लोकमनानेही मला तेवढेच प्रेम आणि आदर दिला होता. म्हणूनच तर माझी पूजा केल्याशिवाय, माझं दर्शन घेतल्याशिवाय लोकमानसाचा दिवसच सुरू होत नसे. निर्मळ दृष्टी आणि शुद्ध विचार हेच तर माझ्या खळाळत्या संचिताचे मर्म आहे. माझ्या प्रवाहात जे कोणी समरस झाले त्यांना घेऊनच तर माझा अविरत प्रवास अनंतापासून अनंताकडे सुरू आहे. अनंताकडे असं म्हटलंय मी, परंतु अलीकडे मला भीती वाटायला लागलीय… मला भास होताहेत… स्वप्ने पडत आहेत की माझा अंत जवळ आला आहे. मला भीती वाटते ती माझं सर्वस्व संपून जाण्याची नाही तर ती हीच की ‘माझा पान्हा प्राशून वाढलेल्या आणि माझ्यावरच अवलंबून असलेल्या समस्त जीवसृष्टीची!’
खूप वाईट वाटतं… हृदयात प्रचंड कालवाकालव होते आहे.
माझे हे असे हाल होताना मी दोष देऊ तरी कोणाला? आपलीच माणसे जेव्हा आपला घात करतात तेव्हा ते सहनशक्तीपलीकडील वेदना असते. माझ्यावरच ज्यांचा पिंड पोसला आणि आताही माझ्या अस्तित्वाशिवाय ज्यांचे जगणेच अशक्य आहे, तीच माझी मुलं माझा अनन्वित छळ करीत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी माझे तुकडे तुकडे करीत आहेत. छोट्या- छोट्या बांधांमधून, धरणांमधून मला माझीच मुलं बांधू पाहात आहेत. माणूस सृष्टीच्या उरावर बसून जणू थयथयाट करीत आहे. सर्व सृष्टीचा संहार करीत असलेला माणूस जणू काही स्वताला सर्वश्रेष्ठ समजून वृथा अहंकार बाळगत आहे. या सर्व घडामोडीत माझी काय अवस्था झाली असेल याची किंचितही जाणीव कोणाला कशी होत नाही, हीच मला खंत आहे. नदी पाप दूर करते, डोक्यातील व हृदयातील घाण प्रवाहाबरोबर वाहून नेते. नदी म्हणजे शेकडो ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रवाहांचे परममंगल अद्वैत दर्शन होय! नदी म्हणजे सुंदर, उदात्त, परमोच्च सहकार्य! तिचे शेकडो प्रवाह येऊन एकमेकांत मिसळतात. त्यात कधी घाण, मैला वाहून नेणारे गटार असते, तर कधी छोटे-मोठे ओहोळही सामील झालेले असतात. त्यांची सुरुवात कोठेही झालेली असो; मात्र त्यांचा संगम जिथं होतो तेथील त्यांची समरसता अनुभवण्यासारखी असते. ही समरसता महान कार्यासाठी उपयोगी आणायची हीच तर या प्रवाहांची अभिजातता आहे. या प्रवाहाला लांबी-रुंदी-खोली लाभली. परंतु जिचा पान्हा प्राशून समस्त मानवी समाज जन्मला, वाढला आणि आताही जिच्याशिवाय त्याच जगणं अशक्य आहे त्याच्या ठिकाणी मात्र विचारांची लांबी तर नाहीच, मग विचारांची सखोलता तरी असण्याची आशा कशी धरायची? माणूस, निसर्ग, शेती या नदीच्या म्हणजे माझ्याच काठाकाठाने फुलली. माझा काठ असाच भरगच्च… हिरव्याकंच-काळ्याकभिन्न महाकाय कातळांनी, विशाल डेरेदार वृक्ष, वाघासारखे राजबिंडे प्राणी, विविध पक्षी- प्राणी- जलचर- औषधी वनस्पती… एकूणच जैवविविधतेने नटलेला. माझा परिसर कोणालाही हेवा वाटावा असा. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम असलेला… मी मुक्त, मी अमर्याद, मी अव्याहत, मी चिरंतन… मी अवखळ… मी खळखळ… मी कृष्णाच्या बासरीचा अनाहत नाद. मी भूतलावरील जीवसृष्टीची आंतरिक साद…! पण माझ्या याच रूपाला उद्ध्वस्त करू पाहात आहेत माझेच भूमिपुत्र. मातेचे कधी कोणी विभाजन करतात का हो… सांगा… तुम्हीच सांगा! माझी जन्मभूमी कर्नाटक तर कर्मभूमी गोवा. गोव्याच्या सात तालुक्यांतून मी निरंतर प्रवाहित आहे. सत्तरी तालुक्याची मी मोठी आई- महादयी- पुढे तिसवाडीत मांडवी नावाने सर्वपरिचित आहे. कधी माझ्या कुणी भूमिपुत्रांनी सत्तरीतील माझी रूप बघितले तरी आहेत का? बघणे, आस्वाद घेणे म्हणजे मला ओरबाडून टाकणे नव्हे. माझ्या कळसा नाल्याचा प्रवाह अडवून मला मलप्रभेत वळविले गेले आहे… गोव्यात प्रवाहित होण्याची वर्षोनुवर्षांची माझी परंपरा आता खंडित झालेली आहे. कळणार का कुणाला माझी मनोव्यथा? की राजकारण, समाजकारण करण्यासाठी फक्त माझ्या नावाचा वापर करायचा? गोव्यातील सात तालुक्यांतून वाहणारं माझं लोभसवाणं रूप कोणालाही मोहविणारं… पण सर्वांना मी कोठे आपली वाटते? येथेही वाटे घातले गेलेत. तुकड्या-तुकड्यांनी मला विभागून टाकलंय. पावसाळ्यात धबधब्याच्या रूपातील माझा आगळावेगळा आविष्कार विकृत नजरेने बघणारी, माझी नासधूस करणारी, माझ्या सोबतीने छायाचित्रे काढून मिरवणारी माझीच मुले; मात्र माझ्याशी त्यांचे काहीच देणेघेणे नसल्यासारखी वागतात. माझं अस्तित्व पिढ्यान् पिढ्या टिकावे म्हणून तुमची काहीच का जबाबदारी नाही? माझं रूप, माझी जैविक संपदा, माझ्याच पाण्याने परिपूर्ण झालेली कुळागरे, माझ्या काठावरची संस्कृती, इतिहास आज धूसर होत चाललाय. पण याची कोणालाही खंत नाही, याचंच दुःख आज मला वाटतंय. खरं सांगायचं म्हणजे मला कोणीही मर्यादा घालू शकत नाही… मी अमर्याद, अनंत, चिरतरुण आहे. पण माझं हे चिरतारुण्य जाणून घेण्यासाठी वेळ तरी कोणाकडे आहे? जेव्हा पाण्यासाठी जीव तळमळेल, सर्वत्र हाहाकार माजेल तेव्हाच शहाणपण सुचेल. पण त्यावेळी वेळ हातातून निसटून गेलेली असणार. जगण्यासाठी श्‍वासाइतकीच महत्त्वाची गोष्ट आपण जाणूनबुजून दुर्लक्षित करतो, आणि नको असलेल्या गोष्टींचे गाठोडे अधिकाधिक फुगवत आपल्याच मार्गातील अडचणी वाढवून ठेवतो.

माझ्याबाबतीतही तुम्ही असेच अक्षम्य दुर्लक्ष करीत आहात. गोव्याचा एक भूमिपुत्र कानीकपाळी ओरडून, तहानभूक हरपून तुम्हाला, सरकारला जागृत करीत आहे. परंतु तुम्ही सारेच झोपेचे सोंग घेऊन आहात. सघन, परिपुष्ट अशा ‘म्हादईच्या जंगलातील वाघ
कर्नाटकातून पर्यटनाच्या निमित्ताने गोव्यात आले’ असे म्हणणारी माझीच, माझ्याच सहवासात लहानाची मोठी झालेली सुशिक्षित व्यक्तिमत्त्वे ‘म्हादई कर्नाटकाची आहे… तिला खुशाल वळवू द्या’ म्हणून हात झटकूनही मोकळी होण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. मी निरंतर वाहात आहे, अनादीकाळापासून प्रवाहित आहे… माझी असोशी, माझी ओढ गोव्याकडे आहे. या भूमीने मला मोकळेपणा दिला, माझ्यावर भरभरून प्रेम केलं… तेच प्रेम, माझ्यासाठीची तीच भावनाविवशता इथल्या मनामनांत अखंडित खळाळत राहो. नदी आणि आई वेगळी कुठे आहे? दोघीही समानच. हवं ते आणि नको असलेलेही ओटीपोटात घालून वाहात राहणं हा तर आमचा धर्मच! समर्पण हे त्याचेच एक नाव… म्हणूनच तर बांध घालून प्रवाह अडविणार्‍या तळहातांची ओंजळ ही कधी रिती राहात नाही.