मिरामार समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरची वाळूच्या टेकड्यांना धडक

0
107

मिरामार येथे समुद्रातील मांडवी नदीच्या तोंडावरील वाळूच्या टेकड्यांना एक मच्छीमारी बोट धडकण्याची दुर्घटना काल पहाटे घडली. सुदैवाने या दुर्घटनेत मच्छीमारी बोटीवरील ८ मच्छीमार बचावले आहेत.

ओशियन स्टार ही मच्छीमारी बोट (ट्रॉलर) पहाटे ४.३० वाजता मच्छीमारीसाठी समुद्रात जात असताना मिरामार येथील वाळूच्या टेकड्यांना धडकली. यामुळे बोटीच्या लाकडी फळ्यांची हानी झाल्याने पाणी बोटीमध्ये घुसले. या दुर्घटनाग्रस्त बोटीवरील मच्छीमारांना दुसर्‍या बोटीतून सुरक्षित स्थळी आणण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. मच्छीमारी बोट चालकाला पहाटेच्या वेळी वाळूच्या टेकड्यांचा अंदाज आला नाही. समुद्राला जोडणार्‍या तोंडावरील वाळूच्या टेकड्यामुळे दरवर्षी एकतरी मच्छीमारी बोट दुर्घटनाग्रस्त होते.

बंदर कप्तान, मच्छीमारी खात्याकडे मिरामार येथील वाळूच्या टेकड्याच्या ठिकाणी होणार्‍या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे. परंतु, लक्ष दिले जात नाही, अशी माहिती मच्छीमारी बोट व्यावसायिक मिनिनो आफोन्सो यांनी दिली.