मिठाची झगमगती दुनिया…

0
139

मिठाच्या खाणीत आपण कुठल्या लेव्हलवर आहोत त्याचे बोर्ड लावलेले दिसतात. लाकडी लांबच्या लांब पॅसेज ओलांडून आपण दुसर्‍या दालनात पोचतो आणि समोरचे दृश्य पाहून अचंबित होतो. कारण समोर एक भव्य चॅपेल दिसतं. त्याचं नाव ‘चॅपेल ऑफ सेंट किंगा.’ खाली उतरायला दोन्ही बाजूंनी पायर्‍या आहेत. पायर्‍या प्रशस्त आहेत. खाली उतरत असतानाच दृष्टिपथात येतात ती कडेच्या भिंतीवरची कोरलेली भित्तीचित्रे. त्यात मुख्यत्वे करून येशूच्या जन्मापासूनचे प्रसंग कोरलेत. चर्चच्या दोन्ही बाजूनी आयताकृती हॉल आहेत. भित्तीचित्रांमध्ये एक म्हणजे गाढवावर बसलेली त्याची आई मदर मेरी, तिने मांडीवर घेतलेला येशू बाळ आणि गाढवाला ओढत नेणारे त्याचे वडील हे प्रवास करायला निघालेत हे चित्र लक्ष वेधून घेतं. येशूचा जन्म, येशू त्याच्या अनुयायींबरोबर बसलेला अशी चित्रे दिसतात. ‘द लास्ट सफर’ हे प्रसिद्ध ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेलं चित्र आहे. प्रत्येक चित्र येशूच्या जीवनावरचे प्रसंग डोळ्यासमोर उभे करून दाखवणारे आहे आणि तेही मिठाच्या खडकातूनच कोरून तयार केलेत.
हॉलच्या मधोमध देव्हार्‍यासारख्या कमानीत येशू मदर मेरीसमवेत हा पुतळा आहे. चॅपेलच्या छतावरही कोरीवकाम केले आहे. वरून खाली साखळ्यांच्या आधारे सोडलेली आकर्षक झुंबरे सुंदर नाजूक कोरीवकाम करून घडवलेली आहेत. त्यासाठी पांढर्‍याशुभ्र मिठाच्या स्फटिकांचा वापर केला आहे, त्यामुळे ती हुबेहूब काचेच्या लोलकांचे झुंबर असते तशीच दिसतात व आत सोडलेला लाईट परावर्तीत करतात. अशी ओळीने पाच-सहा झुंबरे लटकवलेली दिसतात. त्या प्रकाशात चॅपेलचा तो हॉल झगमगून उठताना दिसतो. या चॅपेलमध्ये लग्ने होतात. त्याला लागूनच एक मोठा डायनिंग हॉल आहे. तिथे मोठे फायर प्लेस आहे व एका वेळी भरपूर माणसे जेवायला बसू शकतील अशी याची रचना आहे. या खाणीतली काही शिल्पे सोळाव्या- सतराव्या शतकातली आहेत. त्यातीलच एक म्हणजे हॉली क्रॉस हे अठराव्या शतकातलं आहे. खाणीमध्ये पूर्वीच्या काळी इतकी सुरक्षितता घेतली जात नसेल किंवा काही कारणांनी अपघात होत असतील म्हणून तिथे चर्च स्थापन केले गेले. लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्हायची.
येथे एकूण चार चॅपेल्स आहेत. ही सगळी माहिती सांगायला एक गाईड आपल्याबरोबर असतो. कुठेतरी जमिनीतील बारीकसा पाण्याचा ओहोळ जरी असला तरी ते पाणी एका पाईपलाईनद्वारे एका कुंडात जमा केलं जातं. पाण्यामुळे मीठ हळूहळू विरघळू शकतं म्हणून ही खबरदारी घ्यावी लागते. सगळी दालने पाहायला दीड ते दोन तास चालावं लागतं. आणखी खालच्या लेव्हलवर गेलं की तिथे एक मोठ्ठ तळंही पाहायला मिळतं. त्यातलं पाणी हे मिठाचा संपृक्त द्राव असल्यासारखे म्हणजे खूप मीठ असलेले आहे. त्यामुळे त्यात कुणी बुडत नाही. ते तळेही खूप छान डेकोरेटिव्ह आहे. जमिनीच्या खाली इतकं खोलीवर असल्याने अंधार असतो. त्यासाठी सतत प्रकाशाची, लाईटची गरज भासते. एका लेव्हलवर इथल्या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या औषधी पाण्याचा ट्रिटमेंटसाठी वापर करून घेण्यासाठी लोक ‘स्पा’ करून घेतात. इथे ‘स्पा’चे सेन्टर आहे. तसेच कुणाला स्वत:ला ते मीठ खणून वगैरे बघायचे असेल तर टुरिस्टसाठी वर्कशॉप घेण्यात येतं. लाकडी ओंडके कापायला शिकवलं जातं. त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ पाहिजे. एकदम खालच्या लेव्हलवर आपण पोचतो तिथे मोठ्या मोकळ्या जागेत बरीच सुवेनिअर शॉप्स आहेत. तिथे मिठाचे खूप वेगवेगळ्या रंगाचे स्फटिक, मिठाच्या स्फाटिकांचे लोलक लावलेले इयररिंग्ज, मिठाच्या स्फटिकात घडवलेल्या कलाकृती, पुतळे इत्यादी विकायला ठेवलेल्या आहेत. शो पिसेससुद्धा त्या मिठातच बनलेले दिसतात. छोट्याशा पोतीतून मीठही (खडे मीठ) विकायला ठेवलेले दिसते. तसेच बाकी गोष्टी म्हणजे रंगीत स्टोनमधली ज्युवेलरी ठेवलेली असते. एखाद्या झाडासारखी दिसणारी मिठाच्या क्रिस्टलची कलाकृती पटकन आवडून जाते, पण महाग तर असतेच, शिवाय ती घरी येईपर्यंत सांभाळावी लागेल त्यामुळे विचार रहित होतो. त्याशिवाय आपल्या इकडच्या दमट हवेमुळे तिला पाणी सुटले तर? शेवटी मीठच ते! मग सगळी ज्युवेलरी भाजीत घालावी लागेल.