मावशी… ते … आण्टी!

0
310

– अनुराधा गानू

तंत्रज्ञानात आम्ही भारतीय तेवढेच हुशार आहोत, पण आपल्या तंत्रज्ञानावर, आपल्या हुशारीवर, आपल्या संशोधनावर, आपल्या औषधांवर एकूणच आपल्याला आण्टीच्या प्रशस्तीपत्रकाची गरज लागते. एकदा का आमच्यावर ‘‘फॉरेन रिटर्न्ड’’ असा शिक्का बसला की आम्ही भारतीय धन्य झालो.

‘‘माय मरो आणि मावशी जगो’’ असा एक वाक्‌प्रचार फार लहानपणापासून ऐकत आलोय. पण आता एक नवीनच वाक्‌प्रचार कानावर आलाय. माझ्या मुलाच्या मित्राकडूनच ऐकलाय तो. ‘‘आपण मावशीला सोडलंय आणि आण्टीला धरलंय’’ आणि मला ते पटलंही. खरंच, आपण आपलं सगळंच सोडलंय. आपल्या मावशीचा पदर आपण सोडलाय आणि प्रत्येक गोष्टीत आण्टीच्या मागे आपण धावतोय. आपलं खाण-पिणं, वागणं-बोलणं, खेळ-खेळणी, औषधं, आपले संस्कार, आपली संस्कृती अशा एक ना दोन, कितीतरी गोष्टीत आपण आण्टीच्याच पावलावर पाऊल ठेवून चालतोय.

नुकतेच आम्ही सगळे कुठे बाहेर गेलो होतो. तिथे आम्हाला आमच्या परिचयाचं एक कुटुंब भेटलं. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पटकन् हात जोडले. म्हटलं, ‘‘नमस्कार.’’ त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या मुलांनी लगेच ‘‘हॅलो आण्टी’’ म्हणत हात पुढे केला. मीही केलं हस्तांदोलन. नवीन वाक्‌प्रचाराची लगेच प्रचीती आली. सगळे गप्पा मारत होते. मी मात्र त्यांच्या दोन छोट्या नातींच्या कपड्यांकडे पाहत होते. मोठी असेल १०-१२ वर्षांची आणि छोटी ७-८ वर्षांची. स्लिव्हलेस, तोकडे आणि मोठ्या गळ्याचे टी शर्टस् आणि शोधाव्या लागतील इतक्या छोट्या पॅन्ट्‌स. वाटलं, आपण लोक कधीपासून असे कपडे घालायला लागलो? हे आज पाश्चात्त्य पेहरावाचं खूळ आलं कुठून? लहानपणापासून अशा कपड्यांची सवय लागल्यावर मोठेपणीसुद्धा तसेच कपडे घालतात. हल्ली मोठ्या किंवा आई या सदरात मोडणार्‍या ३५ ते ४५ च्या वयाच्या मुलीसुद्धा मोठ्या गळ्यांचे, तोकडे व स्लिव्हलेस टी शर्टस् आणि जीन्स घालणंच जास्त पसंत करतात. आवड आपली-आपली. मान्य आहे. काळाबरोबर आपण बदलायलाच हवं पण इतकं? मग काही अनुचित घडलं की सगळ्या माध्यमांवर त्याची जोरात चर्चा चालू होते. सगळे चॅनेल्स ही बातमी कशी रंगवून रंगवून सांगता येईल याचा प्रयत्न करत असतात. मग अशा मुलांना रस्त्यात उभं करून फटके मारावे इथपासून शिक्षेची सुरवात होते. अशा गोष्टी घडणं हे निश्‍चितपणे वाईटच आहे. पण त्या मुलानंही मावशीला सोडलं असेल तर?
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा किती बदलल्या आहेत. बघा ना… ब्रिटीश आण्टीनं आम्हाला चहा प्यायला शिकवलं. चीनी आण्टीनं च्याऊ म्याऊ मंच्युरीयन खायला घातलं. इटली आण्टीनं पिझ्झा दिला. कोणी आम्हाला कोकाकोला, थम्स अप प्यायला दिलं. आता आमच्या मुलांना तेच लागतं. शिरा-पोहे-उप्पीठ-थालीपीठ-सांदण या सगळ्याला नाकच मुरडतात आमची मुलं. फसफसणार्‍या कोल्ड ड्रिंक्सपुढे आमचं लिंबू, कोकम सरबत साईड ट्रॅकवर गेलंय हे मात्र खरं. या इटालियन आण्टीनं आपला पगडा इतका जबरदस्त बसवलाय की त्यापायी आपल्या आईचा आपण अपमान करतोय हेसुद्धा आत्ताच्या निर्लज्ज मुलींना कळत नाही. इटालियन नूर नूडल्सची जाहिरात सगळ्यांनी बघितली असेलच ना. तसंच वेगवेगळ्या कंपन्यांची क्रीम्स. शतकानुशतके आपल्या स्त्रिया चेहरा खुलवण्यासाठी दूध, साय, हळद, मध, दही, लिंबू यांचा वापर करत आल्या आहेत. पण आता या नवीन नवीन परदेशी क्रीमच्या मागे आपण लागलो आहोत. पण जेव्हा या आण्टीचा बडगा बसेल तर मावशीकडेच यावं लागेल बरं!!

आपल्या ऋषीमुनींच्या काळापासून आयुर्वेद, योग, ध्यान, धारणा हे सगळं परंपरेने चालत आलंय. पण आपल्या घरांतल्या मुलांना सांगा, ‘‘अरे, योगासनं शिकून घे, सूर्य नमस्कार घाल, व्यायाम कर… की लगेच उत्तर मिळेल ‘‘अगं हो, आता मी जिममध्येच जाणार आहे.’’ म्हणजे मग पाच-सहा हजारांचा तरी अनाठायी खर्च. सूर्यनमस्कार तर अष्टांग व्यायाम. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो. योगासनांचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना व्यायाम मिळतो. आपल्या रोगाची मूळ कारणे आहेत- मानसिक ताण, असमाधान, अपचन आणि कमकुवत शरीर. योगासनामुळे मानसिक ताण कमी होतो. मनाला समाधान मिळते. पचनक्रिया सुधारते आणि शरीर सुदृढ बनतं. आणि हे सगळं असलं की रोगांची संख्या आपोआपच कमी होईल ना. आयुर्वेद औषधांमुळे रोग मुळापासून उखडला जातो. पण ते लक्षात घेतो कोण? रोगानं परत परत डोकं वर काढलं तरी चालेल. मग लगेच औषधं द्यायला परदेशी कंपन्या आहेतच तयार. या परदेशी औषध कंपन्यांनी आपलं औषधांचं जाळं इतकं छान विणलंय की रक्तदाब, मधुमेह इ. रोगांची परिमाणंसुद्धा त्याच ठरवतात बहुतेक आणि आपली औषधं खपवतात.

आजकाल इंग्रजी माध्यमाचं भूत तर सगळ्यांच्या मानेवर बसलंय. या आण्टीच्या भाषेत विषय मुलांना कितपत कळतो कोण जाणे! प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावं असा टाहो शिक्षण-तज्ज्ञांनी कितीही फोडला तरी आजचा पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत घालतो. त्यांची आयुष्याची सुरवात गणेश वंदनेने होत नाही, अ षेी अिश्रिश पासून होते. ही ३-३ वर्षांची मुलं ५०-५० स्पेलिंग पाठ करायला लागली की खरंच वाईट वाटतं. पाठीवर दप्तराचं ओझं, मेंदूवर अभ्यासाचं ओझं आणि स्पेलिंग चुकलं तर आईवडील, शिक्षक सगळेच रागावतील याचं मनावर ओझं. एवढ्याशा चिमुरड्यांनी ओझी तरी किती वहायची हो! आपल्या मुलांना आईची-मावशीची भाषा येत नाही याची आपल्याला लाज नाही वाटत पण आण्टीची भाषा येत नाही याची मात्र आपल्याला लाज वाटते. बघा ना, गुड मॉर्निंग हा शब्द आपल्या इतका परीपाठाचा झालाय की सुप्रभात हा शब्द आपल्या कानावरही पडत नाही. आपण सुप्रभात म्हटलं की समोरचा गुड मॉर्निंग म्हणतो.

आपली सगळी संस्कृतीच आण्टीमय झालीय. ‘‘लिव्ह इन् रिलेशनशिप’’ हा नवाच खेळ आजकाल सुरू झालाय. हीसुद्धा परदेशी संस्कृती. मुलं-मुली काही वर्षे एकत्र राहतात. पटलं तर राहा एकत्र नाही तर शोधा दुसरा भिडू. यातच एन्जॉयमेंट! आणि करमणुकीतून संतती झालीच तर आपल्या भारतात आहेतच अनाथ बालकाश्रम. पण अनाथ बालकाश्रम हे अनाथ असलेल्या मुलांसाठी असतात, अनाथ केलेल्या मुलांसाठी नसतात हे कोणालाच माहीत नाहीये. आपल्या विवाह संस्थेचे, आपल्या कुटुंब संस्थेचे संस्कार गेले कुठे??

आजकाल आपली मुलं परदेशात स्थायिक झाल्येत हे आपण किती अभिमानाने, किती कौतुकाने सांगतो. पण मुलगा पुण्या-मुंबईत राहतो, कोल्हापूरमध्ये किंवा मडगाव-पणजीमध्ये स्थायिक झालाय हे सांगताना त्या कौतुकाची धार थोडी बोथट होतेच. अहो, मुलीचं लग्न झालं आणि जावयाबरोबर गेलीसुद्धा अमेरिकेला!! आणि असा जावई मिळाला की मुलीच्या आईवडलांना अगदी आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यांचे हात जणू आभाळालाच टेकतात. त्यावरून एक गंमत आठवली. एकदा मी व माझी मैत्रीण ओरीसाला फिरायला गेलो होतो. तिथं मुंबईचं एक जोडपं आम्हाला भेटलं. बोलता बोलता ते गृहस्थ म्हणाले, ‘‘माझा मेव्हणा गोव्याचाच. ऑर्थोपेडिक सर्जन आहे. लंडनला स्थायिक झालाय. हुशार आहे आणि नवीन डॉक्टर झालेल्या मुलांना परदेशी जाण्यासाठी छान मार्गदर्शन करतो. त्याच्या मदतीने इथले कितीतरी डॉक्टर्स तिकडे स्थायिक झालेत.’’ माझी मैत्रीण एकदम म्हणाली, ‘‘व्हेरी बॅड’’. ते गृहस्थ चक्रावले. म्हणाले, ‘‘अहो, ही किती अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणताय व्हेरी बॅड’’. मग त्यांना म्हटलं, ‘‘अहो, तो शिकलाय कुठे?’’ तर ते म्हणाले, ‘‘अर्थातच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये.’’ मग मी म्हटलं, ‘‘म्हणजे तो शिकलाय मावशीच्याच पैशावर ना? पण त्या शिक्षणाचा उपयोग होतो आण्टीला. आणि आपल्या इथल्या लाखो मावश्या उपचाराविना खितपत् पडल्यायत’’. मग मात्र ते गप्प झाले.

आपल्या खेळांचंसुद्धा असं आहे. जो उठतो तो ब्रिटीशांच्या क्रिकेटकडे. आपले देशी खेळ- खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लगोरी, लंगडी, कुस्ती, मल्लखांब, सूरपारंब्या हे खेळ विशेष कोणाला माहीतच नाहीयेत. अर्थात कुठलाही नवीन खेळ शिकणं चांगलंच आहे. पण आपल्या देशी खेळांना कमी लेखून नव्हे. मध्यंतरी कुठेतरी जात होते. काही लहान लहान मुलं रस्त्यानं चालली होती. त्यांच्यातला संवाद ऐकला. ‘‘अरे, क्रिकेट कसला रे सॉलिड खेळ, त्यापुढे आपले सगळे खेळ फुसके. आणि शिवाय सॉलिड पैसा मिळतो रे क्रिकेटमध्ये!’’ मनाला पटलं. क्रिकेट खेळणार्‍यांना खरंच लाखांनी पैसा मिळतो. सगळेच पैशासाठी खेळत नाहीत. पण पैसा हे एक आकर्षण आहेच. पण फक्त देशासाठी खेळणार्‍यांचा जमाना लोटून तपं झाली, हेही तितकंच खरं. बापू नाडकर्णी, नाना जोशी, लाला अमरनाथ, विजय हजारे अशी कितीतरी नावे घेता येतील.. की ज्यांनी स्वतःच्या खिशाला चाट मारून देशासाठी क्रिकेट खेळले. या परदेशी खेळासाठी पैसा अक्षरशः ओतला जातो आणि आपल्या खेळांसाठी???
अहो, आपल्या मुलांना खेळणी लागतात ती सुद्धा ‘मेड इन् चायना’, ‘मेड इन् अमेरिका’, ‘मेड इन् जापान’. पण ही खेळणी घेऊन तो पैसा परदेशी लोकांना उपयोगी पडतोय. पण आपण जर अशी खेळणी आपल्याच देशात बनवली आणि ती आपण घेतली तर तो पैसा आपल्याच देशात राहील आणि तो आपल्याच मुला-माणसांना उपयोगी पडेल. हे जर का आपण आपल्या मुलांना लहानपणापासून समजावले तर ते त्यांच्या मनावर नक्कीच बिंबेल आणि पटेलही. पण हे कोण कोणाला समजावणार? तंत्रज्ञानात आम्ही भारतीय तेवढेच हुशार आहोत, पण आपल्या तंत्रज्ञानावर, आपल्या हुशारीवर, आपल्या संशोधनावर, आपल्या औषधांवर एकूणच आपल्याला आण्टीच्या प्रशस्तीपत्रकाची गरज लागते. एकदा का आमच्यावर ‘‘फॉरेन रिटर्न्ड’’ असा शिक्का बसला की आम्ही भारतीय धन्य झालो.

आणि हा दोष मी फक्त तुम्हालाच देतेय असं नाही. अहो, तुम्ही काय, आम्ही काय आणि मी काय सगळे आम्ही एकाच दर्यात पोहतोय. पण मावशीला सोडून आण्टीकडे जाऊ नका. शेवटी मावशीच तुमची राहणार, हे लक्षात ठेवा.