मालिकेत बरोबरीचे न्यूझीलंडचे लक्ष्य

0
120

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून कोलंबोच्या पी सारा ओव्हल मैदानावर खेळविला जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकून श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरीचा पाहुण्या संघाचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने हा कसोटी सामना न जिंकल्यास आयसीसी कसोटी क्रमवारीत त्यांना स्थानाचा किंवा स्थानांचा (ऍशेस मालिकेतील तिसर्‍या कसोटीच्या निकालावर अवलंबून) फटका बसू शकतो. या मैदानावर श्रीलंकेचा जय-पराजयाचा रेकॉर्ड ९-७ असा आहे. त्यामुळे यजमानांनासुद्धा जेतेपदाचा दावेदार असे म्हणता येणार नाही.

पहिल्या कसोटीत केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून चांगला खेळ दाखवण्याचा दबाव न्यूझीलंडवर असेल. त्यांचा कर्णधार केन विल्यमसन दोन्ही डावात अपयशी ठरला होता. त्यामुळे हे अपयश मागे टाकून मोठी खेळी करण्याचा त्याच्यावर दबाव असेल. सामना जिंकल्यास आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ६० गुणांची कमाई होणार असल्याने उभय संघांचा विजय मिळविण्याकडे कल असेल. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करण्याची शक्यता लक्षात घेता न्यूझीलंडचा संघ विल सॉमरविल किंवा ऐजाझ पटेल यांच्यापैकी एकाला बाहेर बसवून नील वॅगनरला अंतिम ११मध्ये घेऊ शकते. दुसरीकडे अष्टपैलू दिलरुवान परेरा तंदुरुस्त झाला असला तरी त्याला कोणाच्या जागी खेळवायचा हा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर आहे. नवख्या एम्बुलदेनियाला बाहेर बसविल्यास धनंजय डीसिल्वा, अकिला धनंजया व दिलरुवान या तिन्ही ऑफ ब्रेक गोलंदाजांना खेळविण्याचा धोका त्यांना पत्करावा लागू शकतो. न्यूझीलंडच्या तसेच श्रीलंकेच्या फलंदाजी विभागात बदल संभवत नाही.