मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

0
197
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार स्वीकारताना पं. मालवीय यांचे कुटुंबीय.

बनारस विश्‍वविद्यालयाचे संस्थापक, हिंदू महासभेचे नेते तथा स्वातंत्र्यसैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांना काल मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मालवीय यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. मालवीय यांच्यासह भारतरत्न पुरस्कार मिळवणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. काल राष्ट्रपतींनी भारतरत्न पुरस्कारासह पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचेही वितरण केले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल व जगद्गुरू रामानंदचार्य स्वामी रामभद्राचार्य यांना राष्ट्रपतींनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तर
पत्रकार स्वपन दासगुप्ता, डेव्हिड फ्रॉलेय, माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी, साईचिरो मिसुमी, सुधा रघुनाथन, हरीश साळवे, सतपाल, पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय राष्ट्रपतींनी ३४ जणांना पद्मश्रीने सन्मानित केले. त्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, साहित्यिक जॉय चतुर्वेदी, प्रसून जोशी, उषा किरण खान, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, हॉकीपटू सरदार सिंग, व्हॉलिबॉलपटू पौर्णिमा सिन्हा यांचा समावेश होता.
यंदा ९ जणांना पद्मविभूषण, २० जणांना पद्मभूषण व ७५ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.