माजी सभापतीप्रा. सुरेंद्र सिरसाट अनंतात विलीन

0
95

>> मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आजी-माजी आमदारांनी घेतले अंत्यदर्शन

>> म्हापश्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

म्हापसा मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी सभापती प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट काल अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर काल दुपारी दत्तवाडी, म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवा पोलीस दलाच्या जवानांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यांचे पुत्र ओंकार सिरसाट यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी सिरसाट यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवारी रात्री खासगी इस्पितळात त्यांचे उशिरा निधन झाले होते. काल मंगळवारी सकाळी डांगी कॉलनी, धुळेर, म्हापसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबोे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार रवी नाईक, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार नीळकंठ हळर्णकर, ज्योशुआ डिसोझा, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, माजी सभापती दयानंद नार्वेकर, राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, सदानंद मळीक, अशोक साळगावकर, व्हिक्टर गोन्साल्विस, माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जुझे ङ्गिलिप डिसोझा, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे, भाजपचे संघटक मंत्री सतीश धोंड, माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर, माजी मंत्री संगीता परब, विनायक नाईक, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, आम आदमी गोवा पक्षाचे संयोजक राहुल म्हाम्बरे, शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत, मगो केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे, वैश्य मंडळाचे अध्यक्ष अभय गौंडळकर, म्हापसा बाजाराचे अध्यक्ष शिवानंद धावजेकर, वैश्य अर्बन पत संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद शिरोडकर, बार्देश बाजारचे उपाध्यक्ष नारायण राठवड, पोलीस अधीक्षक दिनराज गोवेकर, माजी नागराध्यक्ष सुधीर कांदोळकर, सुभाष नार्वेकर, रूपा भक्ता, माजी नगरसेवक तुषार टोपले आदी मान्यवरांनी सिरसाट यांचे अंत्यदर्शन घेतले.

अंत्ययात्रेत सिरसाट यांचे चाहते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे सर्वांनी मास्कचा वापर केला होता. पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहतूक पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी फौजफाट्यासह वाहतुकीची चोख व्यवस्था सांभाळली.

प्रा. सिरसाट यांना ‘गुज’ची श्रद्धांजली
गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांचे सोमवारी रात्री म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात निधन झाले होते. एक कुशल विधानसभापटू म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे अनेक पत्रकार साक्षिदार आहेत. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेला त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख होत असल्याचे गुजने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एकेकाळी गोवा विधानसभेतील बुलंद आवाज बनलेले प्रा. सिरसाट हे एक प्रभावी वक्तेही होते. तसेच एक प्रतिभावान साहित्यिक, चित्रकार, खेळाडू असे त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व होते, असे गुजने म्हटले आहे.

प्रा. सिरसाट यांना विधानसभेत श्रद्धांजली
गोवा विधानसभेचे दिवंगत माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांना काल गोवा विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांना श्रद्धांजली वाहताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, सुरेंद्र सिरसाट हे एक चरित्र्यवान असे राजकीय नेते होते. विधानसभेत कित्येक वर्षे त्यांना पाहण्याची संधी आपणाला मिळाली. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षाने गोव्याला काही मोठे राजकीय नेते दिले. सुरेंद्र सिरसाट हे त्यापैकी एक होते, असे ते म्हणाले. त्यांनी मंत्री व सभापती म्हणूनही चांगले योगदान दिल्याचा उल्लेख ढवळीकर यांनी केला. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही चांगले योगदान दिल्याचे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव म्हणाले की, सिरसाट हे एक चरित्र्यवान असे व्यक्ती होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले योगदान दिले आहे.