माजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन

0
9

>> मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंतिम दर्शन

डिचोली मतदारसंघाचे माजी आमदार, गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग राऊत (७६) यांचे काल सोमवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव करासवाडा म्हापसा येथील घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, दिगंबर कामत, रमाकांत खलप, ज्योसुआ डिसोझा, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक मंत्री, नेते, आजी-माजी आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. साळ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

पांडुरंग राऊत यांनी दोनवेळा डिचोली मतदारसंघातून विजय संपादन केला. त्यांनी पर्यटन, वीज, आरोग्य, वाहतूक आदी विविध मंत्रिपदांवर काम केले. उत्तर गोव्यातर्फे खासदार निवडणुकीतही ते उतरले होते.
डिचोली तसेच राज्याच्या विकासासाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबवले. डिचोली बायपास, कदंब स्थानक, उपअधीक्षक कार्यालय, वाहतूक कार्यालय आदी प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत झाले. डिचोली शहराचा मास्टर प्लान त्यांनी आखला होता.

शिक्षण क्षेत्रातही योगदान
शासकीय पातळीवर शिमगोत्सव सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. साळ व मुळगाव या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे. राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

मान्यवरांकडून श्रद्धांजली
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, राऊत यांनी अतिशय प्रामाणिक सेवा कार्य करताना मंत्री व आमदार या नात्याने अनेक योजना राबवल्या. स्वभावाचे राऊत हे उत्तम नियोजन करीत असे उद्गार काढले.
माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी, भाई राऊत ही व्यक्ती खूप दिलखुलास व प्रेमळ होती. त्यांचे कार्य आपण जवळून पाहिलेले असून अनेक क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. ग्रामीण भागांत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली. त्यांच्या निधनाने एक परिपूर्ण बुजुर्ग राजकीय मार्गदर्शक व नेता गोव्याने गमावल्याची खंत व्यक्त केली.

भाई राऊत हे माझ्यासाठी आदरणीय होते. त्यांनी खूप क्षेत्रांत कार्य केले. शिक्षण, सहकार, कला, संस्कृती, पर्यटन, उद्योग, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. त्यांच्या जाण्याने एक उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना आमदार डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केली.