माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभूंना 3 महिने कारावास अन्‌‍ लाखाचा दंड

0
19

>> तूर्त शिक्षेला स्थगिती; म्हापशात 3 अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरण

येथील बाल न्यायालयाने पेडण्याचे माजी नगराध्यक्ष वासुदेव देशप्रभू यांना म्हापसा येथे तीन अल्पवयीन मुलांना मारहाण केल्या प्रकरणी 3 महिने साधी कैद आणि 1 लाख 10 हजार रुपये दंडाची शिक्षा काल फर्मावली. बाल न्यायालयाच्या अध्यक्षा सायोनारा लाड यांनी हा आदेश दिला. तथापि, बाल न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीला येत्या 12 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
ही मारहाणीची घटना 2013 मध्ये घडली होती. देशप्रभू राहत असलेल्या म्हापसा येथील इमारतीच्या गच्चीवर तीन मुले खाद्यपदार्थ खात होती. देशप्रभू यांनी त्या मुलांना इमारतीच्या गच्चीवरून बाहेर जाण्याची सूचना केली; मात्र त्या मुलांनी सूचनेचे पालन न केल्याने त्यांना काठीच्या साहाय्याने मारहाण केली होती. त्यात एका मुलाला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी एका पीडित मुलाच्या वडिलांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास काम पूर्ण करून 2016 मध्ये बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

तीन मुलांना मारहाण प्रकरणी बाल न्यायालयाने वासुदेव देशप्रभू यांना दोषी ठरविले असून, गोवा बाल कायद्याअंतर्गत तीन महिन्याची साधी कैद आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास 4 महिन्याची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच मारहाण प्रकरणी 5 हजार रुपये दंड, पुरावे नष्ट केल्या प्रकरणी 5 हजार रुपये दंड ठोठावला. हे दोन्ही दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड भरल्यास 50 टक्के रक्कम मुलाच्या नावे राष्ट्रीय बँकेत कायम ठेवण्यास बाल न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, देशप्रभू यांच्या वकिलांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यासाठी शिक्षा निलंबित ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार बाल न्यायालयाने 12 डिसेंबरपर्यंत ही शिक्षा स्थगित ठेवली आहे.