माजी खासदार, घटनातज्ज्ञ ऍड. अमृत कासार यांचे निधन

0
112

उत्तर गोव्याचे माजी खासदार, वकील, घटनातज्ज्ञ, समाजसेवक अमृत कांसार (वय ७०) यांचे काल सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अल्प आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथेच सोमवारी सकाळी ६.३० वा. त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र व दोन कन्या असा परिवार आहे.
आज सकाळी सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा पर्वरी येथील पत्रकार कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.
अमृत कांसार हे कर्करोगाने आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईतील इस्पितळात उपचार चालू होते. मात्र, चतुर्थीपूर्वी त्यांना गोव्यात आणण्यात आले होते. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी तेथेच त्यांचे निधन झाले. कांसार यांचे पार्थिव गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शवागारात ठेवण्यात आलेले असून आज सकाळी अंत्यदर्शनासाठी ते त्यांच्या पर्वरी येथील निवासस्थानी आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. नंतर निवासस्थानावरून सांतइनेज-पणजी येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अंत्ययात्रा निघेल.
अमृत कांसार हे १९७७ साली मगो पक्षाच्या उमेदवारीवर उत्तर गोव्यातून खासदार म्हणून निवडून आले होते. व्यवसायाने वकील व घटनातज्ज्ञ असल्याने खासदार म्हणून त्यानी लोकसभेत चांगले काम केले होते. मात्र, १९९० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. मात्र, ह्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नंतर त्यांनी कॉंगे्रस पक्ष सोडून गोमंत लोक पक्षात प्रवेश केला.
एक अजातशत्रू, समाजसेवक अशी त्यांची जनमानसात प्रतिमा होती.
कुळ-मुंडकारांना सहकार्य
एक वकील ह्या नात्याने ते सदैव कुळ-मुंडकार यांना त्यांचे खटले लढण्यासाठी मदत करीत असत. अल्प शुल्क आकारून किंवा कधी कधी अत्यंत गरीब कुळ-मुंडकारांचे खटले ते मोफतही लढत असत. त्यामुळे कुळ-मुंडकार यांच्यात एक ‘मसीहा’ अशी त्यांची प्रतिमा होती.
कांसार यांच्या मृत्यूचे वृत्त आल्यानंतर कित्येक मान्यवरांनी त्यांच्या मृत्यूविषयी दु:ख व्यक्त केले. एक मनमिळावू व्यक्ती अशी त्यांची जनमानसात प्रतिमा होती.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अँड. अमृत कांसार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, माजी खासदार असलेले कांसार यांनी १९७७ची लोकसभा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाद्वारे लढविली होती. ते एक अष्टपैलू वकील आणि कायदे पंडित होते. मये स्थलांतरीत मालमत्तेच्या प्रकरणी त्यांनी सरकारला केलेले मार्गदर्शन बहुमोल होते. सामाजिक आणि इतर क्षेत्रात त्यांनी केलेली सेवा मौल्यवान होती. त्यांनी सामान्य लोकांच्या हक्कासाठी लढा दिला असे श्री. पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कांसार यांच्या कुटुंबियांना आपल्या सहवेदना कळविल्या आहेत.
श्रीपाद नाईकांकडून दु:ख व्यक्त
अमृत कासार हे गोव्यातील एक अग्रणी व तत्वनिष्ठ वकील होते. वकिलीचा व्यवसाय सांभाळत असताना सामाजिक बांधिलकीही त्यांनी जोपासली होती. खासदार म्हणून लोकांनी निवडून दिल्यानंतर आपल्या मतदारांच्या विश्‍वासास ते पात्र ठरले. कुळ-मुंडकार कायदा आणि राज्य घटना यात त्यांचा हातखंडा होता. विशेषत: अंधश्रध्दा निर्मुलन, जातीयवाद विरोध, राज्यभाषा अशा अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता असे सांगून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कासार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.