मांद्रेतील यश शूटिंग हब जळून खाक

0
10

>> राष्ट्रीय शूटिंग स्पर्धा होणार मात्र पिस्तुले, बंदुका जळाल्या

काल रविवारी पहाटे 5च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे मांद्रे येथील यश शूटिंग अकादमीच्या यश शूटिंग हबला आग लागल्याने सुमारे 35 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती यश शूटिंग अकादमीचे मालक योगेश्वर पाडलोस्कर यांनी दिली. या ठिकाणी 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान खुल्या गटातील राष्ट्रीय शूटिंग स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा ठरल्याप्रमाणेच होणार असून यात सुमारे 5 हजार खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती देऊन श्री. पाडलोस्कर यांनी त्या साठी आतापासूनच गोव्यातील खास करून मांद्रे येथील हॉटेलचे मोठ्या प्रमाणात बुकिंग झाल्याचे सांगितले.

या आगीत यश शूटिंग अकादमीचा सर्व्हर रूम तथा मुख्य खोलीत ठेवलेल्या रायफल शूटिंगच्या विविध रेंजच्या बंदुका, पिस्तूल, काडतुसे, गोळ्या, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप इत्यादी किमती सामान आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. 10 पेक्षा जास्त बंदुका जळाल्या असून त्यांची प्रत्येकाची किंमत 3 ते 10 लाख रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

या आगी विषयी माहिती देताना श्री. पाडलोस्कर यांनी, मी माझ्या करासवाडा म्हापसा येथील निवासस्थानी झोपलो असताना अकादमीतील सुरक्षारक्षकाने रविवारी पहाटे 5 वा. आग लागल्याची माहिती दिली. आम्ही लगेच अग्निशमक दलाशी संपर्क साधला व आम्ही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाची गाडी पोचली परंतु तोपर्यंत सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यात आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

याविषयी अकादमीच्या प्रमुख तथा प्रशिक्षक सौ. भाग्यश्री पाडलोस्कर यांनी, ज्या ठिकाणी रायफल किंवा अन्य शूटिंग स्पर्धा घेतल्या जातात ती शूटिंग रेंज सुरक्षित आहे. त्यामुळे 18 तें 28 ऑगस्ट दरम्यान गोव्यात प्रथमच होणाऱ्या खुल्या गटातील शूटिंग स्पर्धा ठरल्या वेळेत पार पडतील असा विश्वास व्यक्त केला. यात 4500 पेक्षा जास्त खेळाडूंनी नावनोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मांद्रेचे उपनिरीक्षक परेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश शेट्ये यांनी पंचनामा केला.