मांगूर हिलमध्ये एकूण ६ जण बाधित

0
152

>> ‘त्या’ कुटुंबातील चार तर दोन शेजारी पॉझिटिव

मांगूर हिल वास्को येथील कोरोनाबाधित त्या कुटुंबातील आणखी चार सदस्य आणि दोन शेजार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे कोविड चाचणीत स्पष्ट झाले आहे. तर, ट्रूनेट चाचणी पॉझिटीव आढळून आलेल्या स्थानिक डॉक्टरचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव आला आहे. मांगूर हिल परिसरातील नागरिकांच्या कोविड चाचणीला प्रारंभ करण्यात आला असून सुमारे २०० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

मांगूर हिलमधील कोरोनाबाधित कुटुंबातील चार जणांचा बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेला कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटीव आला आहे. या कुटुंबाजवळ राहणार्‍या दोन शेजार्‍यांचा कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटीव आला आहे. या सहा कोरोनाबाधित रुग्णांना मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.
आरोग्य यंत्रणेने मांगूर हिल भागातील नागरिकांची कोविड तपासणीसाठी पहिल्या दिवशी सुमारे २०० नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेतले आहे. कोरोना विषाणू बाधित घराच्या आसपास असलेल्या घरांतील नागरिकांची प्रथम कोविड चाचणी केली जात आहे. सुमारे दोन हजार लोकांची तपासणी केली जाणार आहे. त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेले नागरिक कोविड चाचणीसाठी पुढे येत आहेत, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
मांगूर हिल येथील त्या कुटुंबातील एक सदस्य पोलीस खात्यात कार्यरत आहे. कोरोनाची बाधा झालेला पोलीस शिपाई कार्यरत असलेल्या पोलीस स्थानकाची अग्निशामक दलाच्या साहाय्याने पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. या पोलीस शिपायाच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची कोविड चाचणी केली जात आहे. मांगूर हिल येथील त्या डॉक्टराची कोविड चाचणीचा अहवाल निगेटीव आल्याने स्थानिक नागरिक आणि सरकारी यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे.

मांगूर हिलमधील २०२
नागरिकांची तपासणी
मांगूर हिल येथे कोरोनाबाधित सापडल्यामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्य तपासणीचे काम कालपासून हाती घेण्यात आले. काल एकूण २०२ जणांची आरोग्य तपासणी करून त्यांचे नमुने अहवालासाठी पाठवण्यात आले आहेत. आज बुधवारीही तपासणी चालू राहणार असून यासाठी आठ डॉक्टर कार्यरत आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे मांगूर हिल परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. सोमवारी दुपारपासून मांगूर हिल भागात उपजिल्हाधिकारी परेश देसाई, मामलेदार सतीश प्रभू, मुख्याधिकारी गौरिष शंखवाळकर, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई, पोलीस निरीक्षक परेश नाईक, हरीश मडकईकर यांनी ठाण मांडून हा भाग कंटेन्मेंट केला. मांगूर हिल येथील अंबाबाई मंदिर, वरुणा पुरीपर्यंतचा संपूर्ण भाग पोलिसांनी सील केला आहे. तसेच येथील लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या वस्तीतील कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना आत सोडण्यात आले. परंतु पुन्हा बाहेर येता येणार नाही अशी ताकीद पोलिसांकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, या भागातील रहिवाशांची टप्प्याटप्प्याने आरोग्य तपासणी काल सकाळपासून सुरू केली आहे. त्यासाठी वास्कोतील तीन, मडगावचे तीन तर पणजीचे दोन डॉक्टर कार्यरत आहेत. यावेळी नगरसेवक फेड्रीक्स हेन्रीक्स व यतीन कामुर्लेकर यांनी हजेरी लावून डॉक्टरांना सहकार्य केले.
आमदार कार्लूस आल्मेदा यांनी येथील रहिवाशांचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिकांनी केले काणकाचे
प्रवेशद्वार बंद
साईनगर काणका (बार्देश) येथील एका अपार्टमेंटमध्ये दोन दिवसांपूर्वी उतरलेले एक जोडपे व दोन लहान मुले यांची कोरोना चाचणी निगेटिव आली आहे. सोमवारी संध्याकाळी काणकात कोरोनाबाधित सापडल्याचे वृत्त पसरताच स्थानिकांनी काणकाचे प्रवेशद्वार बंद केले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रवेशद्वार खुले केले.

दरम्यान, सध्या चौघांवरही बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. सदर जोडपे आपल्या दोन मुलांसह मुंबईला नातेवाईकांकडे सुट्टीनिमित्ताने गेले होते. ते रविवारी सकाळी आपल्या गाडीने काणकातील आपल्या राहत्या घरी परतले होते. सोमवारी येथील जागृत नागरिकांनी पणजी मुख्य आरोग्यधिकारी कार्यालयात याबाबतचे वृत्त दिले. त्यानंतर तात्काळ म्हापसा जिल्हा इस्पितळाची रुग्णवाहिका घटनास्थळी येऊन संबंधितांना कोवीड-१९ चाचणीसाठी इस्पितळात घेऊन गेले. त्यावेळी ते चौघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना प्रथम मडगांवच्या कोवीड-१९ इस्पितळात व त्यानंतर पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले.

काणकातील तिघांचा
अहवाल निगेटिव
वेर्ला म्हापसा येथील ट्रूनेट चाचणी पॉझिटीव आढळून आलेल्या ३ जणांचा कोविड चाचणीचा अहवाल निगेटीव आला आहे, अशी माहिती आरोग्य सचिव मोहनन यांनी दिली. मुंबईतून रस्ता मार्गाने आलेले तिघे ट्रूनेट चाचणीत पॉझिटीव आढळून आल्याने खळबळ उडाली होती. परराज्यातून आलेले तिघेही पळून गेले नव्हते. तर, त्यांना सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ठेवण्यासाठी नेण्यात आले होते, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

कोलवा पोलीस स्थानकावरील ७० जणांची कोरोना चाचणी
मांगोरहील येथील एका कुटुंबाला कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये कोलवा पोलीस स्थानकावरील एक पोलीस कॉन्स्टेबल होता. त्यामुळे काल त्या स्थानकावरील ७० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. सदर कॉन्स्टेबल वायरलेस विभागात काम करीत आहे. त्याला गस्तीवर पाठवण्यात आले नव्हते. पण पोलीस स्थानकावर त्याची बाधा होण्याची शक्यता असल्याने पोलिसांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, काल रात्री पोलीस स्थानक औषधी फवारे मारून साफ करण्यात आले.

१३ रुग्ण बरे झाल्याने
बाधितांची संख्या २२
राज्यातील कोरोनाबाधित आणखी १३ रुग्ण बरे झाले असून कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २२ झाली आहे. तर, जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आत्तापर्यंत ७९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीच्या प्रयोगशाळेत १५९८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर, प्रयोगशाळेतून १६९६ नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील १६९० नमुने निगेटिव आहेत. आणि ६ नमुने पॉझिटिव आहेत.