महागाईविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी तसेच अन्य काही कॉंग्रेस खासदारांना ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ काल गोवा राज्य महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथील कॉंग्रेस भवनसमोर निदर्शने करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक म्हणाल्या की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंवरील जीएसटी वाढवला असून, परिणामी सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशातील गरीब जनतेचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध नेते महागाईविरुद्ध आवाज उठवत आहेत. आवाज उठविणार्या कॉंग्रेस नेत्यांना अटक करून त्यांचा आवाज दडपण्याचा जो प्रयत्न सरकारने चालवला आहे, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे नाईक यांनी स्पष्ट केले.