महाराष्ट्र, हरयाणा विधानसभांसाठी १५ ऑक्टोबरला निवडणुका

0
101

१९ रोजी मतमोजणी : आचार संहिता लागू
महाराष्ट्र व हरयाणा राज्यांच्या विधानसभांसाठी येत्या १५ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार असून १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच ५ राज्यांमधील पाच विधानसभा मतदारसंघांसाठीही याच दिवशी पोटनिवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रलयंकारी पूरस्थितीमुळे तेथील निवडणुकांविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेसाठी २८८ मतदारसंघांमध्ये तर हरयाणा विधानसभेसाठी ९० मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. अरूणाचल प्रदेश, मणीपूर, नागालँड, उत्तर प्रदेश व गुजरात या पाच राज्यांमधील ५ जागांसाठी पोटनिवडणुकाही १५ ऑक्टोबर रोजीच होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील बीड व ओडिशातील कंधमाल या लोकसभा मतदारसंघांसाठीही १५ ऑक्टोबर रोजीच मतदान व १९ रोजी मतमोजणी होईल. या सर्व मतदारसंघांमध्ये निवडणुक आचार संहिताही लागू झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांची अधिसूचना येत्या २० रोजी जारी केली जाणार आहे.
कंधमाल सोडून अन्य सर्व मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर अशी आहे.
जम्मू-काश्मीरमधील पूरस्थितीवर निवडणूक आयोगाचे लक्ष असून तेथील निवडणुकांविषयी योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असे संपत म्हणाले. त्यांनी सांगितले की हरयाणा विधानसभेची मुदत २७ ऑक्टोबर रोजी व महाराष्ट्र विधानसभेची मुदत ८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर जम्मू-काश्मीर व झारखंडच्या विधानसभांची मुदत संपण्यास अजून वेळ असल्याचे ते म्हणाले.