महाराष्ट्रात आजपासून दिवसा जमावबंदी

0
143

>> रात्रीची संचारबंदी, शनिवार-रविवारी लॉकडाऊन

>> ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने काल घेतलेल्या बैठकीत आज सोमवार दि. ५ एप्रिलपासून काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार आज सोमवारपासून दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे. हे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत. लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

शनिवार, रविवारी लॉकडाऊन
महाराष्ट्रात मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्यात दर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावत लॉकडाऊनबाबत गंभीरपणे चर्चा करून एकमताने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्यात वीक एंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. येत्या शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करण्यात येतील.

पंतप्रधानांनी घेतली विशेष बैठक
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वेगाने पसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरिय बैठक बोलावली. या बैठकीत कोरोना लसीकरण व कोरोना उद्रेक या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याची सूचना केली. या पंचसूत्रीमध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोविड नियमांचे पालन व लसीकरण यांचा समावेश आहे.

उद्यापासून विशेष मोहीम
कोरोनापासून बचाव करण्यासाठी उद्या मंगळवार दि. ६ ते १४ एप्रिलपर्यंत देशभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात लोकांना १०० टक्के मास्क वापरणे, सामाजिक व वैयक्तिक स्वच्छता याबाबत माहिती देण्यात येणार आहे.