गेल्या काही दिवसांपासून राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत असल्यामुळे सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीसांची घोषणा
हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काल रविवारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जीआर सरकारने रद्द केले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी त्रिभाषाच्या सूत्रांच्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. डॉ जाधव हे कुलगुरू तसेच नियोजन आयोगाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना केली जाईल. यात आणखी काही सदस्य असतील. त्यांचीही नावे लवकरच घोषित केली जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र लागू केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.