महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा होणार सुनावणी

0
17

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी युक्तिवाद पूर्ण झाला असून, गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी हे पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरू झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे. कालच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला.

यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा समूह नाही. या लोकांना पक्षाच्या बैठकीत बोलावण्यात आले होते; मात्र ते आले नाहीत. खरेतर हे लोक पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे ते मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाहीत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. पक्षाचे सदस्यत्व सोडणार्‍या आमदारांना अपात्र ठरवले जाते, हा मुद्दाही त्यांनी मांडला.

त्यावर शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी प्रतिवाद केला. ज्या नेत्याला बहुमत नाही, तो पक्षप्रमुख पदावर कसा राहू शकतो. शिवसेनेत अंतर्गत अनेक बदल झाले आहेत. या आमदारांना कोणी अपात्र ठरवलं? पक्षात अंतर्गत फूट पडली असताना दुसर्‍या गटाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने अपात्र कसे ठरवता येते, असा सवाल त्यांनी केला.