महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज होणार?

0
5

>> शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात शपथविधी सोहळा रंगणार आहे. शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंकडून बैठकांचं सत्रही सुरू झाले आहे. मात्र अद्यापही महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. ही घोषणा आज दि. 2 होण्याची शक्यता असून मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्य दावेदार आहेत.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालीय. राज्यासह देशभरातील 15 हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. महत्त्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विविध राज्यातील मुख्यमंत्री, बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सेलिब्रिटींसह, धर्मगुरू, साधुसंतांनाही आमंत्रण दिलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्यांनाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा असेल असे राष्ट्रवादीने आधीच जाहीर केले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. त्यानंतर दिल्लीत महायुतीची चर्चा झाली. आता अखेर भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट केलेले नाही. मात्र यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची तर शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मात्र भाजपने अद्याप विधिमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही.

मुख्यमंत्रीपदी कोण?

शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून बैठका घेतल्या जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येणार असल्याचे सांगून मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप जाहीर केले नसले तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे.

आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा!

सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसेच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. 5 डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी होणार असल्याचं बावनकुळेंनी जाहीर केले असले तरी मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या भाजपच्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा ः शिंदे

मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे यांनी काल स्पष्ट केले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचे गृहखाते मागितल्याची चर्चा आहे.शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी आहेत. तसेच उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींबाबत काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून प्रतिक्रिया देताना भाजपला पाठिंबा असल्याचे सांगितले.