महामानव अब्दुल कलाम

0
247
–  प्रा. रमेश सप्रे
वराहमिहिर- आर्यभट्ट- भास्कराचार्य; केप्लर- न्यूटन- आइन्स्टाइन आणि अलीकडच्या काळातले डॉ. रामन- डॉ. होमी भाभा- डॉ. विक्रम साराभाई यांच्या मांदियाळीत दिमाखानं तळपणारे वैज्ञानिक होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम!  विसाव्या नि एकविसाव्या शतकांचा सेतू असलेला विज्ञान- संशोधन क्षेत्रातील विरक्त तपस्वी असलेला हा मनस्वी शास्त्रज्ञ आपले ओजस्वी विचार अन् यशस्वी जीवनगाथा मागे ठेवून २७ जुलै २०१५ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.
चार वर्षांपूर्वीचा तो हृदय हेलावून टाकणारा प्रसंग. स्थळ होतं आसाममधील शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय्‌आय्‌एम्). केवळ भारतातील जनतेवरच नव्हे तर सार्‍या मानवजातीवर प्रेम करणार्‍या नि ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु’ ही प्राचीन ऋषींची प्रार्थना प्रत्यक्षात आणण्यासाठी अखंड तळमळणारा नि धडपडणारा एक प्रेषित त्या दिवशी श्रोत्यांना उद्देशून एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार होता. त्याच्या विचारांना असलेली वैज्ञानिक- आध्यात्मिक- मानवतावादी पैलूंची झालर अनेकांना मोहून टाकणारी होती. त्याची वाणी आकाशवाणीसारखी भविष्यकाळातील घटनांची सूचना देणारी होती. व्याख्यानाचा विषयही सर्वांच्या जिव्हाळ्याचा होता- ‘जगण्यासाठी (जीवनासाठी) योग्य अशा पृथ्वीची निर्मिती (क्रिएटिंग अ लिव्हेबल् प्लॅनेट अर्थ)’
सारा रंगमंच तयार होता. कोणालाही काही क्षणात घडणार्‍या भावी घटनेची बिलकुल कल्पना नव्हती. योग्य वेळी वक्तामहोदय सभास्थानी आले. सभागृहात जाण्यासाठी जिन्याच्या पायर्‍या चढताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. काही वेळ शेजारच्या खोलीत विश्रांतीसाठी नेलं. थोडं बरं वाटू लागल्यावर वक्ता जिद्दीनं सभागृहात आला. आरंभीच्या स्वागत- परिचय- प्रास्ताविक इ. औपचारिकता पुरी झाली नि हा भविष्याचा वेध घेणारा वक्ता आपलं भाषण करायला उभा राहिला. सभागृहात कमालीची शांतता पसरली. आपलं भाषण सुरू करणार इतक्यात तो वक्ता खाली कोसळला. कुणाला काहीच कळेना. त्वरित उपचार सुरू झाले. पण तो हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की त्याची प्राणज्योत मालवली.
कोण होता हा सार्‍या मानवजातीसाठी प्रेषित वैज्ञानिक (प्रॉफेट सायंटिस्ट)? तो वक्ता होता विश्‍वविख्यात वैज्ञानिक, भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती- ए.पी.जे. अब्दुल कलाम!
विसाव्या नि एकविसाव्या शतकांचा सेतू असलेला विज्ञान- संशोधन क्षेत्रातील विरक्त तपस्वी असलेला हा मनस्वी शास्त्रज्ञ आपले ओजस्वी विचार अन् यशस्वी जीवनगाथा मागे ठेवून गेला होता.
दोन वैदिक मंत्र तो आयुष्यभर जगला होता.
मृत्युंजय मंत्र- (ॐ त्र्यंबकं यजामहे) सुगधिं पुष्टि वर्धनम् उर्वारूकमिवबंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ॥
आणि शांतिमंत्र- असतो मा सद्गमय|
तमसो मा ज्योतिर्गमय|
मृत्योर्मा अमृतं गमय॥
खरंच वराहमिहिर- आर्यभट्ट- भास्कराचार्य; केप्लर- न्यूटन- आइन्स्टाइन आणि अलीकडच्या काळातले डॉ. रामन- डॉ. होमी भाभा- डॉ. विक्रम साराभाई यांच्या मांदियाळीत दिमाखानं तळपणारे वैज्ञानिक होते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम!
संपूर्ण नाव- अवुल पाकिर जैनुलाबदीन अब्दुल कलाम. पण सर्वसामान्यपणे त्यांना डॉ. अब्दुल कलाम किंवा फक्त कलाम या नावानं ओळखलं जातं.
अब्दुल कलामांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी एका तामिळ मुस्लिम कुटुंबात झाला. घरची गरीबी. कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय म्हणजे लोकांना नावेतून रामेश्‍वर ते धनुष्कोडी या जलमार्गावर न्यायचं नि आणायचं. यामुळे कुटुंबाला एक नाव मिळालं होतं- मारा कलाम इयक्किवर म्हणजे लाकडाच्या नावेतून प्रवाशांची नेआण करणारे- लाकडी नौका चालवणारे.
वडील जौनुलाबदीन नि आई आशिअम्मा हे जुन्या वळणाचे होते. मुलांना लहानपणापासूनच काम करून कुटुंबाला हातभार लावावा लागे. छोटा अब्दुल वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत असे. उरलेल्या वर्तमानपत्रांच्या रद्दीचे गठ्ठे डोक्यावरून दुसरीकडे – नेण्याचं काम त्याला नेहमी करावं लागे. पण त्याला शिकण्याचीही खूप आवड होती. त्यासाठी आवश्यक ती जिद्द नि चिकाटी त्याच्या अंगात भरपूर होती.
शालेय पातळीवर फार हुशार विद्यार्थी म्हणून अब्दुल कधी झळकला नाही. पण गणिताच्या अभ्यासाचा ध्यास त्याला सतत लागलेला असे. हे त्याचं वैशिष्ट्य त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आलं होतं. पण मुख्य म्हणजे हा गणिताच्या अभ्यासाचा ध्यास त्याच्या भावीजीवनाचा श्‍वास बनणार होतं नि देशाच्या विकासालाही चालना देणारं ठरणार होतं.
पदवीशिक्षण विज्ञानशाखेत पूर्ण केल्यावर पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यानं क्षेत्र निवडलं- अवकाश अभियांत्रिकीचं (एअरोस्पेस इंजिनिअरिंग). संपूर्ण शिक्षणकालात अब्दुलचा भर फक्त परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासापेक्षा संशोधनावर अधिक होता. त्या काळात नवीन असलेल्या तंत्रज्ञानातील बारकावे शोधून- अभ्यासून त्यांना प्रत्यक्षात उतरवण्याचं जणू व्यसनच अब्दुल कलामांना लागलं होतं.
याचा सहज परिणाम म्हणून त्यांनी सेवेसाठी क्षेत्र निवडलं ‘संरक्षण क्षेत्रातील संशोधन नि विकास’ (डी.आर्.डी.ओ.) या क्षेत्रात काम करताना कलाम स्वतःला भाग्यवान समजत असे कारण एक तर त्याला संशोधन, तेही अवकाश संशोधन विभागात करणं मनापासून आवडत असे अन् दुसरं मुख्य कारण म्हणजे त्याक्षेत्रातील त्यावेळच्या दिग्गज वैज्ञानिकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन. अतिशय कृतज्ञतेनं अब्दुल कलाम या तीन भारताच्या महान सुपुत्रांचं स्मरण करत असत- डॉ. विक्रम साराभाई, प्रा. सतीश धवन आणि डॉ. ब्रह्मप्रकाश. ‘आपण महाविद्यालय आणि विश्‍वविद्यालय (विद्यापीठ) यात जे शिकलो नाही ते ज्ञानाचं उपयोजन (ऍप्लिकेशन) या व्यक्तींच्या सहवासात शिकलो. जीवनातील हा ज्ञान मिळवणं आणि त्यावर प्रयोग करणं यासाठी घालवलेला काळ आपल्या जीवनातील सुवर्णयुग होतं’ असं ते वारंवार म्हणत. आपल्याला शालेय पातळीवर ज्या साध्या शिक्षकांनी उत्तेजन दिलं, सहाय्य केलं नि अप्रतिम मार्गदर्शन केलं त्यांच्याविषयीचा आदरभाव नि कृतज्ञता त्यांनी आयुष्यभर व्यक्त केली. त्यांची स्मृती हृदयकोशात जपून ठेवली. अब्दुल कलाम यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाचा महत्त्वाचा घटक ही कृतज्ञतेची वृत्ती होती. ती त्यांना माणूस बनवून गेली नि माणूस म्हणून माणसावर प्रेम करायला शिकवून गेली. त्यामुळेच माणुसकीचं मूर्तिमंत प्रतीक बनून गेले अब्दुल कलाम!
त्यांच्यावर ज्यावेळी क्षेपणास्त्रांचा विकास (मिसाइल डेव्हलपमेंट) करण्याची कामगिरी सोपवली त्यावेळी रात्रीचा दिवस नि रक्ताचं पाणी करून त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली. यामुळे त्याना ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून ओळखलं जातं. ‘रोहिणी’ उपग्रह ज्यावेळी यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला त्यावेळी अवकाश संशोधनाच्या जागतिक नकाशावर भारत दिमाखानं तळपू लागला. तो काळ विसाव्या शतकाच्या ऐंशीच्या दशकाचा होता. त्यानंतर या क्षेत्रात भारतानं मागे वळून कधी पाहिलंच नाही.
कलामांच्या व्यावसायिक क्षेत्रातली आणखी एक सुवर्णसंधी म्हणजे जगातील सर्वोच्च असलेल्या अमेरिकेतील ‘नॅसा’ (नॅशनल ऍरोनॉटिक स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन) या संस्थेत त्यांना काम करण्याची, निरीक्षणातून- प्रयोगातून शिकण्याची संधी मिळाली. हे वर्ष होतं. १९६३-६४. या शिक्षणाचा परिणाम दिसण्यास पुढची पंधरा वर्षं गेली.
त्यानंतर काही काळ भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळाली. या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं.
पुढची संधी तर देशसेवेसाठी अनमोल होती. विख्यात अणुतज्ज्ञ डॉ. राज रमण यांनी अब्दुल कलामांची कार्यशैली नि समर्पित वृत्ती पाहून ‘हसणारा बुद्ध’ (स्माइलिंग बुद्धा) या प्रकल्पासाठी खास बोलवून घेतले. पुढे पोखरणच्या भूमीत भारताने केलेले यशस्वी अणुस्फोट हे या कार्याचंच फलित होतं. यामुळे तर भारत जगातील स्वयंपूर्ण अणुशक्ती तंत्रज्ञान विकसित करणारं राष्ट्र बनला. जगातील अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स अशा विकसित राष्ट्रांच्या पंगतीत भारत जाऊन बसला. देश आणि देशवासीयांचा आत्मगौरव शतपटीनं वाढवणारी ही घटना होती.
अब्दुल कलाम ही वेगळ्याच धातूची बनलेली व्यक्ती होती. केवळ ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञान अशा क्षेत्रातच कार्यमग्न राहणं त्यांना मंजूर नव्हतं. अनेकविध पैलू असलेलं मानवी जीवन अन् त्यातील अनेकानेक प्रकारच्या समस्या हाही त्यांच्या चिंतनाचा नि प्रयोगांचा विषय होता.
या पैलूंमुळेच अब्दुल कलाम माणूस म्हणून श्रेष्ठ ठरले. त्यांना लोक संत वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक संत समजू लागले. अध्ययन नि अध्यापन दोन्हीही त्यांचं अक्षरशः अखेरच्या श्‍वासापर्यंत चालू होतं. आरंभी वर्णन केलेल्या प्रसंगातून याचा प्रत्यय आपल्याला येतो. ही माता वसुंधरा (मदर अर्थ) तिच्यावर मानवानं केलेल्या अतिरेकी अत्याचारामुळे प्रदूषित झालीय, भकास बनलीय, तिच्यावरील सारी निसर्गचक्रं (उदा. हवामान- ऋतू- पर्जन्य(पाऊस) यांची चक्रं) अनियमित बनलीयत. पूर तिथं महापूर आणि दुष्काळ तिथं अतिदुष्काळ असं चित्र आपल्या देशातही दिसू लागलंय. आपल्या अनुभवाला येऊ लागलंय.
अशा परिस्थितीत राष्ट्र, समाज, सामान्य माणूस, विशेषतः युवावर्ग यांच्या प्रगतीवर, गुणवत्तेवर सखोल चिंतन कलामांनी सुरू केलं. ते फक्त डोक्यातच ठेवलं नाही. तर हृदयात नि हातातही आणलं. मन- मस्तक- मनगट यांची एकरूपता, एकसूत्रता त्यांच्या कार्यात दिसून येते.
एक लाख युवकांना देशाच्या सर्व भागात फिरून एका नव्या दृष्टीनं प्रेरित नि शिक्षित करण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला. त्यानुसार माध्यमिक- उच्चमाध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना ते उत्स्फूर्तपणे भेटले. पण महाविद्यालयीन नि विद्यापिठात शिकणार्‍या असंख्य तरुणांपर्यंतही ते पोचले. भाषणांबरोबर त्यांनी विपुल ग्रंथलेखनही केलं. त्यातली काही सर्वांनी वाचावीत अशी पुस्तकं खालीलप्रमाणे –
विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद भारतातील व जगातील प्रमुख भाषांमध्ये झालाय. साऊथ कोरियासारखा प्रगतिशील देश तर कलामांच्या ग्रंथातील मार्गदर्शनानं अत्यंत प्रेरित झालाय. आपल्या भाषेत या ग्रंथांचं भाषांतर करून सार्‍या देशातील विचारवंत नि युवावर्गापर्यंत कलामांचा संदेश त्यांनी पोचवलाय.
* सर्वात गाजलेलं त्यांचं आत्मकथनपर पुस्तक म्हणजे- अग्निपंख (विंग्ज ऑफ फायर)
* नंतर अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे- भारत २०२० (इंडिया २०२०)
या पुस्तकात नवीन शतकाची (२१व्या शतकाची) विकासाची ब्लूप्रिंट (नियोजन) त्यांनी सादर केलीय.
* युवावर्गासाठी वाचलंच पाहिजे असं पुस्तक म्हणजे प्रज्वलित मनं (इग्नायटेड माईंड्‌स). विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांनी गुजरातमधील बारावीच्या एका तेजस्वी विद्यार्थिनीला अर्पण केलंय. कारण कलामांच्या ‘भारताचा शत्रू क्र.१ कोण?’ या प्रश्‍नाचं उत्तर पाकिस्तान-चीन, किंवा अंधश्रद्धा- निरक्षरता- अस्वच्छता असं न देता- पॉव्हर्टी ऑफ आयडियाज् म्हणजे कल्पनांचं (कल्पकतेचं) दारिद्य्र- असं दिलं होतं. अजूनही वरवर श्रीमंत झाल्यासारख्या समाजातील वर्गाकडे श्रीमंती नाहीच आहे.
* याशिवाय ‘क्रांतिकारी क्षण- आव्हानांमधला प्रवास’; ‘यू आर् बॉर्न टु ब्लॉसम- टेक माय जर्नी बियॉंड’ – म्हणजे युवकांनो तुमचा जन्म फुलण्यासाठी बहरण्यासाठीच आहे. मी जसा जीवनप्रवास केला त्याच्याही पुढे तुम्ही जीवनयात्रा चालू ठेवा.
इतर अनेक पुस्तकं कलामांनी लिहिलीयत. ती वाचून प्रत्येकानं आशावादी बनून देशाची नि मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळवावी हाच कलामांचा अंतरीचा भाव आहे.
अब्दुल कलामांना देशात व जगात अनेक मानसन्मान मिळाले. पण त्यांना त्यांची किंमत नव्हती. एक महत्त्वाची संधी मिळाली ती राष्ट्रपतीपदाची.
राष्ट्रपतीभवन ही दिल्लीतील एक अतिभव्य वास्तू आहे. तीनशेच्यावर खोल्या असलेल्या या वास्तूतील दोन-तीन खोल्याच कलामांनी वापरात ठेवल्या होत्या. कारण एक तर ब्रह्मचारी होते. त्यांच्या स्वतःच्या वस्तू अशा विशेष नव्हत्या. अगदी आवश्यक ते कपडे, काही पुस्तकं त्यात मुख्य कुराण- गीता- बायबल. विशेष वस्तू त्यांच्या नित्य वापरात होती ती म्हणजे वीणा. चांगल्यापैकी वीणावादन करणारे कलाम या आपल्या छंदाचा उपयोग मन शांत- ताणमुक्त- प्रसन्न राखण्यासाठी करत.
आपल्या गोव्यातील कार्यक्रमात दोन विशेष कार्यक्रम होते. पर्वरीतील संजय स्कूल या दिव्यांगांसाठी असलेल्या शिक्षण संस्थेला भेट आणि पणजीतील कलाअकादमीत सु. ५०० विद्यार्थ्यांशी वार्तालाप. त्यांनी आपल्या भाषणात संजय स्कूलमधील एका विद्यार्थ्यासंबंधातला हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला. त्या दिव्यांगानं त्यांचा हात घट्ट धरून विचारलं, ‘सर, मला देशासाठी काम करायचंय. मी काय करू शकतो ते कृपया सांगा.’
याहीपेक्षा एक हृद्य प्रसंग सांगितलाच पाहिजे.
प्रयोगशाळेत एका मिश्रधातूचं संशोधन चालू होतं जो अतिशय हलका पण अतिउच्च तापमानात न वितळणारा असा हवा होता ज्याचा वापर चंद्रावर, मंगळावर जाणार्‍या यानांसाठी करावयाचा होता. ज्यावेळी हा शोध यशस्वी झाला त्यावेळी त्यांनी त्या पत्र्यापासून पोलियोमुळे पायातली शक्ती गेलेल्या मुलांना उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी जे ब्रेसेस (स्टँड्‌स) तयार केले जातात त्यासाठी करून, काही दिवसांपूर्वी भेट दिलेल्या अशा मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांना वापरण्यासाठी दिले. मुलांना लोखंडी ब्रेसेस घालून चालताना वजनामुळे अवघड जात होतं. आता ब्रेसेसचं वजन इतकं कमी झालं की मुलांनीच वर्णन केलं… ‘आम्ही आज फुलपाखरांसारखे, पतंगांसारखे, ढगांसारखे उडत आहोत- तरंगत आहोत.’ त्यावेळी सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कलामांमधील माणुसकीचा तो मोठ्ठा विजय होता.
जिथं जातील तिथं कलाम मुलांना, युवकांना एक स्वरचित कविता म्हणायला लावायचे- ‘ड्रीम! ड्रीम! ड्रीम!…’ म्हणजे स्वप्नं पहा जागेपणी. स्वप्न पहा स्वप्नावस्थेत नि स्वप्नं पहा गाढ झोपेतही! कारण स्वप्नंच पुढे विचारात उतरतील, विचार कार्यात परिवर्तित होतील नि कार्यामुळे स्वप्न साकार होतील.
– हे सांगणारा हा महामानव केवळ स्वप्नांचा सौदागर किंवा जादुगार नव्हता. तर द्रष्टा होता. स्वप्न साकार करण्याची दृष्टी देणारा द्रष्टा!