महामंडळांनी स्वयंपूर्ण व्हावे ः मुख्यमंत्री

0
182

>> महामंडळांच्या आर्थिक स्थितीचा बैठकीत आढावा

राज्य सरकारच्या महामंडळांना कर्ज कमी करून त्यांना स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध महामंडळांची संयुक्त बैठक घेऊन महामंडळांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात विविध महामंडळांनी सहभागी होऊन आपली कर्जे कमी करून स्वयंपूर्ण होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. महामंडळांनी नवीन उपक्रमाचे आराखडे तयार करून सरकारला सादर करावे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी) स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकारच्या खात्याची विविध कामे घेऊ शकते. केंद्र सरकारच्या रेल्वे, एमपीटी, शिपियार्ड, नाविक दल व इतर खात्याकडून विविध कामे आऊटसोर्स केली जातात. जीएसआयडीसी ही कामे घेऊन स्वयंपूर्ण होऊ शकते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आर्थिक विकास महामंडळ, गोवा पर्यटन विकास महामंडळ व इतर महामंडळांना नवनवीन उपक्रम हाती घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.