महागाई, बेरोजगारीप्रश्‍नी कॉंग्रेस आक्रमक

0
16

>> देशव्यापी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध; आंदोलक व पोलिसांत मोठी झटापट

देशातील बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेसने काल आक्रमक भूमिका घेत देशभरात आंदोलन केले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली. दिल्ली, मुंबईसह देशभरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता; पण दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. अखेर सहा तासांनंतर त्यांना सोडून देण्यात आले.

केंद्र सरकारविरोधात काल कॉंग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशभरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनात सहभागी राहुल आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेताना त्यांच्यासह कार्यकर्ते व पोलिसांत मोठी झटापट झाली. प्रियंका गांधींनी तर अक्षरश: रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

गोव्यासह महाराष्ट्र, हरयाणा, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, झारखंड, पॉंडेचेरी, राजस्थान, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आंदोलन करण्यात आले.

जनतेचे प्रश्न मांडणे हे आमचे काम आहे. मात्र, पोलिसांकडून कॉंग्रेस काही खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी आंदोलनावेळी केला.

तत्पूर्वी, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरू असून, सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. कॉंग्रेसने जे ७० वर्षात कमावले ते भाजपने ७ वर्षात गमावले, अशी टीका त्यांनी केली.

केवळ कॉंग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला, तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते. भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षांना पाठिंबा देणार्‍यांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसून येत नाही. केंद्र सरकारविरोधात जेवढे मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल; पण मी कारवाईला घाबरत नाही. जो धमकावतो तोच घाबरतो.

  • राहुल गांधी, नेते, कॉंग्रेस

कॉंग्रेसचे पणजीत आंदोलन

देशातील वाढती महागाई व बेरोजगारी या प्रश्‍नांवरून कॉंग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून काल पणजीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडत केंद्र सरकारचा निषेध केला.

यावेळी कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी काढलेल्या निषेध मोर्चाला पोलिसांनी अटकाव करत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महिला कॉंग्रेस अध्यक्षा बीना नाईक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस व अन्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कॉंग्रेस भवनाकडून सुरू झालेला हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी तो अडवला.
सरकारने कितीही दडपशाही केली व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली, तरी आमचा महागाई, बेरोजगारी, जीएसटी व अग्निपथ योजनेविरुद्धचा लढा चालूच राहील, असे अमित पाटकर यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश दिवाळखोरीकडे निघालेला असून, महागाई आकाशाला भिडली आहे. जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना जगणेच नकोसे झाले आहे, असेही पाटकर म्हणाले.