महागठबंधन ते समझोता

0
119

महागठबंधनाच्या कल्पनेपासून सुरू झालेली उड्डाणे अखेर कॉंग्रेसशी मोजक्या जागांसाठीच्या समझोत्यापर्यंत येऊन ठेपली आहेत. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांचा सुरवातीपासून महागठबंधनाच्या कल्पनेला वा इतर पक्षांशी युती करण्यास विरोध होता. पक्षश्रेष्ठींनीही त्यांना पाठबळ दिले असल्याचे एकंदर घडामोडींवरून दिसते. अर्थात, हा निर्णय कितपत शहाणपणाचा ते येणारी निवडणूकच सांगेल, परंतु त्या निमित्ताने पक्षातील या विषयावरील दुफळी स्पष्टपणे जनतेसमोर आली. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवील अशी भीमगर्जना दिग्विजयसिंहांनी बर्‍याच काळापूर्वी केली होती. परंतु त्यानंतर बिगर भाजपाई शक्तींना एकत्र करून लढत देणे अधिक व्यवहार्य ठरेल अशी भूमिका पक्षात जोर धरू लागल्याने त्या दिशेने चर्चा, वाटाघाटी यांचे सत्र सुरू करण्यात आले होते. त्यात खूप वेळ काढला गेला. सरतेशेवटी आपल्या मूळ भूमिकेशीच दिग्विजयसिंह परत येऊन ठेपले. या विलंबाचा फटका अर्थातच कॉंग्रेसशी युतीचे गुर्‍हाळ सुरू ठेवलेल्या पक्षांना बसला आहे. सर्वांत केविलवाणी स्थिती झाली ती राष्ट्रवादी कॉंग्रेसची. अगदी रविवारपर्यंत युतीची बोलणी लांबवत ठेवून राष्ट्रवादीला अखेरच्या क्षणी कॉंग्रेसने दूर लोटले. त्यामुळे ऐनवेळी प्रफुल्ल पटेलांना गोव्यात धाव घ्यावी लागली आणि आपले उमेदवार ऐनवेळी विविध ठिकाणी उभे करावे लागले, ज्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराशीही सामना करावा लागणार आहे. कॉंग्रेसशी हातमिळवणीसाठी सर्वांत उत्सुक होता तो गोवा फॉरवर्ड पक्ष. विजय सरदेसाई यांनी भाजपविरोधी मतांच्या एकत्रीकरणासाठी जोरदार प्रयत्न केले. बिहारच्या धर्तीवर महागठबंधनाची कल्पना पुढे रेटली. त्यासाठी कॉंग्रेसवर दबाव निर्माण करण्याकरता खुद्द कॉंग्रेसजनांचीही साथ घेतली. परंतु त्या दबावतंत्रालाही अखेर कॉंग्रेस नेतृत्वाने ठेंगा दाखवीत शेवटी ‘बिग ब्रदर’ कोण आहे हे दाखवून दिले आहे. मात्र, विजय सरदेसाई यांच्यासाठी फातोर्ड्याची जागा सोडण्याची तयारी दाखवून दिग्विजयसिंहांनी आपल्याच कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांच्या प्रतिमेचे दहनही झाले. पण शेवटी फातोर्डा आणि शिवोली या दोन जागांवर कॉंग्रेसने गोवा फॉरवर्डशी तडजोड केली आहे. बाबूश मोन्सेर्रात व रोहन खंवटे यांच्या जागांवरही कॉंग्रेसने तडजोड केली. खरे तर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी झालेल्या बाबूश यांच्यासाठी पणजीची जागा सोडण्याची नामुष्की कॉंग्रेसला पत्करावी लागली आहे. त्यांच्या युनायटेड गोवन्स पक्षाशी ‘युती’ टाळली गेली असली पणजीसाठी समझोता करण्यात आला. या सार्‍या तडजोडीला केवळ ‘जागांबाबत समझोता’ एवढे मर्यादित स्वरूप कॉंग्रेसने दिलेले आहे. आम्ही कोठेही कोणाशी युती केलेली नाही अशीच भूमिका पक्षाने घेतली आहे. ३६ जागांवर त्यांनी स्वतःचे उमेदवार तर उभे केले आहेतच, पण उर्वरित चार जागांबाबतही थेट हातमिळवणी करण्यात आलेली नाही. अर्थात, या संदिग्धतेचा कॉंग्रेसला लाभ कोणता हे कळायला मार्ग नाही. युती नसल्याने आणि केवळ जागांबाबत समझोता असल्याने उद्या निवडणुकोत्तर परिस्थितीत हे सगळे लोक आपापली स्वतंत्र भूमिका घेण्यास मोकळे राहतील. मग त्यांच्यासाठी आपल्या जागा सोडण्याचा कॉंग्रेसला फायदा काय? त्यांच्याशी अधिकृत युती असती तर निवडणुकोत्तर घडामोडींत कॉंग्रेसची साथ देण्याचे किमान नैतिक बंधन या उमेदवारांवर राहिले असते. काही मतदारसंघांमध्ये जागा सोडायच्या आणि उर्वरित मतदारसंघांत ‘मैत्रिपूर्ण लढत’ करायची हेही अनाकलनीय आहे. कॉंग्रेस नेतृत्वाच्या मनातील गोंधळच या सार्‍यातून दिसतो. त्या तुलनेत मगोने देखील अधिक राजकीय हुशारी दाखवली असेच म्हणावे लागेल!