मरिना प्रकल्पासंबंधीची जनसुनावणी लांबणीवर

0
96

नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पासंबंधी २ नोव्हेंबर २०१९ रोजी शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित पर्यावरण जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनसुनावणी पुढे ढकलण्याचे आश्‍वासन सोमवारी दिले होते.

यासंबंधीचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी काल जारी केला असून जनसुनावणीची नवीन तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.

नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या मरिना प्रकल्पासाठी जनसुनावणीची तारीख जाहीर करण्यात आल्याने नागरिकांत खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि आमदारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करून मरिना प्रकल्पाची सुनावणी गोवा किनारी व्यवस्थापन आराखडा अधिसूचित होईपर्यंत स्थगित ठेवण्याची विनंती केली होती. तथापि, सरकारी यंत्रणेकडून जनसुनावणी पुढे ढकलण्याबाबत कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी येथील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच दिवशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार आन्तोनियो फर्नांडिस, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व ग्रामस्थांची बैठक घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मरिनाबाबत जनसुनावणी पुढे ढकलण्याचे आश्‍वासन दिले होते.