मराठी पाऊल पडते पुढे…

0
121
  • – हीरा नारायण गावकर

२७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोवा मराठी अकादमी पुरस्कृत सत्तरी प्रभागाचे साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन दत्तमंदिर, पाली- सत्तरी येथे उत्साहात पार पडले. कोविड महामारीमुळे निस्तेज झालेल्या वातावरणात या संमेलनाने एक सकारात्मक ऊर्जा नांदती केली, तसेच अनेक नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्या नयनरम्य परिसरात पार पडलेला हा कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हीच घोषणा जणू देत होता. एकंदरीत हा सोहळा एक अविस्मरणीय आनंद देऊन गेला…

॥ माझ्या मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ॥
याच काव्यपंक्तींची ग्वाही देत, २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गोवा मराठी अकादमी पुरस्कृत, सत्तरी प्रभागचे साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन दत्तमंदिर, पाली- सत्तरी येथे दिमाखात पार पडले. सर्व कार्यकर्त्यांनी हे संमेलन घडवून आणण्यासाठी अहोरात्र घेतलेले परिश्रम, छोटी मुले तसेच स्थानिक आणि सत्तरीतील इतर मराठीप्रेमी यांनी दाखविलेला उत्साह आणि त्यांचे सहकार्य यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

मराठी सांस्कृतिक केंद्र, पाली-सत्तरी हे दोनच महिन्यांपूर्वी स्थापन झाले असून त्यांनी या केंद्राचा पहिलाच कार्यक्रम- त्याचा उद्घाटन सोहळा- ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रभावीपणे घडवून आणला. त्यामुळेच येथील कार्यकर्त्यांचा तो उत्साह पाहून अकादमीचे वार्षिक संमेलनही याच गावी घेण्याचे ठरले आणि त्यासाठी ठाणे पंचक्रोशी आणि अवघ्या सत्तरी तालुक्यातील मराठीचे कार्यकर्ते उत्साहाने कामास जुटले.

कोविड निर्बंधांमुळे अवघे पंधरा दिवसच तयारीसाठी मिळाले असतानाही सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वीरीत्या घडवून आणला. गोवा मराठी अकादमीचे संचालक श्री. आनंद मयेकर आणि सत्तरी प्रभागचे सचिव रामकृष्ण गावस यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली सभा घेऊन सर्व कामांची आखणी, मांडणी करण्यात आली. सगळी कामे वेळच्या वेळी शिस्तीत पूर्ण करून घेण्यात आली आणि म्हणूनच हा एवढा मोठ्ठा कार्यक्रम नियोजित वेळेत काहीही त्रुटी न राहता दिमाखात पार पडला.

संमेलनासाठी सगळेच पारंपरिक पोषाख- नऊवारी, फेटा, सदरा अशा वेशात शोभून दिसत होते. पहाटेच सगळ्यांनी अगदी नटूनथटून मंदिराची वाट धरलेली. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषाने एक चैतन्य परिसरात भरून उरले होते. तो दिंडीचा नादच इतका भावभरीत होता की निमंत्रित मान्यवरही ग्रंथदिंडीतील पालखीचे भोई होण्यावाचून स्वतःला रोखू शकले नाहीत. या अशा मंगलमय पालखीने या सुदिनाची सुरुवात झाली.

त्यानंतर झालेल्या उद्घाटन सत्रात व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सरकारी माध्यमिक शाळा, वेळगे- डिचोलीचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. बाबुसो गावकर, उद्घाटक ‘गोवन वार्ता’ नियतकालिकाचे संपादक पांडुरंग गावकर आणि बेळगावचे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच सर्वश्री आनंद मयेकर, स्वागताध्यक्ष नरहरी हळदणकर, रामकृष्ण गावस, संमेलनाचे कार्याध्यक्ष रामनाथ खोत, सचिव रोहिदास गावकर आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष देविदास सावंतही व्यासपीठावर मान्यवरांत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाली येथील विद्यालयाच्या छोट्या मुलींनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. तसेच महिलांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्कृष्ट असे स्वागतगीत सादर केले. त्यानंतर समई प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सौ. प्रिया गावकर यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. स्वागताध्यक्ष नरहरी हळदणकर यांनी व्यासपीठावरील निमंत्रित पाहुणे तसेच उपस्थित श्रोते यांचे स्वागत केले. ‘आज आपल्या या मायमराठीचे जतन, संवर्धन होण्यासाठी अशी संमेलने गावोगावी होण्याची गरज आहे, आणि त्यास प्रत्येकाने हातभार लावावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

गोवा मराठी अकादमीच्या ध्येयप्राप्तीसाठी जे प्रयत्न आज मराठीप्रेमींकडून अपेक्षित आहेत त्यास योग्य ते सहकार्य करण्यासाठी आणि आपले संस्कार आणि संस्कृती विसरत चाललेला समाज, आणि ती नाळ अबाधित राखण्यासाठी म्हणून ही मराठी अकादमी आहे, असे विवेचन आनंद मयेकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केले.

पांडुरंग गावकर यांनी गावोगावी मराठी लेखक, कवी तयार व्हावेत आणि त्यांचे लिखाण आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी समाज, विविध संस्था, मराठीप्रेमी यांनी कोणकोणती पावले उचलावीत याविषयी मार्गदर्शन केले.
बाबुसो गावकर हे एक कट्टर मराठीप्रेमी असून मराठीचे संवर्धन होण्याकरिता ही भाषा आपण सर्वांनीच कशी दैनंदिन वापरात आणली पाहिजे, हेच विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विनोद गायकवाड यांना गोमंतकीयांत मराठी भाषेविषयी असलेले प्रगल्भ प्रेम याचे या संमेलनाकरवी दर्शन घडले. अशी संमेलने घडवून आणण्याकरिता कार्यकर्त्यांमध्ये जी एकजूट आणि जो उत्साह त्यांनी पाहिला याने ते थक्क झाले. आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याबद्दल ते बोलले.

त्यानंतर सैनिक गौरव सोहळा पार पडला. भारताचे वीर जवान सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करतात म्हणून आम्ही निर्भयपणे जगू शकतो आणि त्यांच्या या कार्याची दखल घेणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे. यावेळेस या वीर जवानांचा गौरव करण्याची ही संधी अकादमीने दिली. निवृत्त सैनिक गोविंद गावकर यांचे श्री. मयेकर यांनी तर अशोक गावकर यांचे चंद्रकांत गावस यांनी त्यांच्या पत्नीसहीत व्यासपीठावर स्वागत केले. त्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. जे अतुलनीय साहस दाखवून देशाचे रक्षण करत देशाचा प्रपंच सांभाळण्यात आपले तारुण्य समर्पित करतात त्यांचा प्रपंच त्यांच्या सौभाग्यवती खंबीरपणे सांभाळतात, त्यांचाही खणा-नारळाने ओटी भरून गौरव करण्यात आला. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर दाटून आलेला तो कृतार्थ भाव पाहून सगळ्यांचाच ऊर अभिमानाने भरून आला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचालन विष्णू गावस यांनी केले.

त्यानंतर झालेल्या परिसंवादाचे अध्यक्ष चंद्रकांत गावस होते. गोव्यातील प्रसिद्ध साहित्यिक सौ. पौर्णिमा केरकर आणि साहित्यिक, वकील भालचंद्र मयेकर यांनी ‘सरकारी प्राथमिक शाळांची दशा व दिशा’ या विषयावर परखडपणे आपले विचार व्यक्त केले. भालचंद्र मयेकर यांनी गोव्यातील शाळांचे वास्तवचित्र रेखाटले. आपले विचार मांडताना, गोव्यातील मराठी शाळांची हेळसांड न पाहवून ‘बंद पडत चाललेल्या कुठल्याही पाच मराठी शाळा आपणास द्या. आपण फक्त अर्ध्या पगारात त्या शाळा मुलांनी भरून कार्यरत करून दाखवीन’ असे जाहीर आव्हान स्वीकारण्याचे वचन त्यांनी सरकारला दिले. तसेच बंद पडत चाललेल्या शाळांचे काहीच सोयर-सुतक आजच्या लोकप्रतिनिधींना उरलेले नसून पालकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून, या शाळांच्या कारभारावर स्वतः लक्ष देऊन त्या पुन्हा कार्यान्वित करण्याची खडखडीत सूचनाच त्यांनी पालकांना केली. तसेच प्राथमिक शिक्षणाची दुर्दशा थांबविण्यासाठी प्राधान्याने पावले उचलावीत असे उद्गार त्यांनी सरकारला उद्देशून काढले.

भालचंद्र मयेकर हे एक मराठी शिक्षक असूनही आवड म्हणून त्यांनी वकिलीचा हा रुक्ष पेशा स्वीकारला. मराठीबद्दलचे अतोनात प्रेम आणि राज्यात सरकार आणि समाजाकडून होत असलेली मराठी शाळांची उपेक्षा सहन न होऊन ते पोटतिडकीने बोलत होते.

अध्यक्ष चंद्रकांत गावस यांनी ‘आजच्या घडीला शिक्षकाला सर्वात जास्त पगार असूनही शाळा उत्तम चालविण्याची तयारी आणि तशी मानसिकताही आज शिक्षकांची राहिली नाही’ या सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकला. केंद्र शाळा डिचोली, हेडगेवार यांसारख्या शाळांत मुलांच्या नावनोंदणीसाठी वाट पाहावी लागते, त्याचे कारण सरकारी प्राथमिक शाळांची होत असलेली अक्षम्य हेळसांड आणि त्यामुळेच तेथे घटत असलेली विद्यार्थ्यांची संख्या या गोष्टीकडे त्यांनी सार्‍यांचे लक्ष वेधले.

प्रा. पौर्णिमा केरकर यांनी सद्यस्थितीत होत असलेली प्राथमिक शाळांची दुर्दशा आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेतला. तसेच तरुण मुले जी शिक्षण क्षेत्रामध्ये येताहेत त्यातील बरीच प्रामाणिकपणे आपल्या कार्यास वाहून घेताना दिसतात, असे सुचिन्ह त्यांनी दर्शविले. आज या शिक्षकांना विविध कार्यशाळांची गरज असून पालकांनीही त्यास सक्रिय सहकार्य द्यावे असे विचार त्यांनी मांडले. एकंदरीत या परिसंवादात मान्यवरांनी आपले जे अमूल्य विचार मांडले ते समाज, शिक्षक, मुले आणि सरकार या सर्वांस दिशादर्शक असेच आहेत. तीनही वक्त्यांनी परिसंवादाच्या विषयाला योग्य न्याय दिल्यामुळे हा परिसंवाद उत्तरोत्तर रंगत गेला. या सत्राचे सूत्रसंचालन बाळकृष्ण गावस यांनी केले.

दुपारी १ वाजता मंदिराच्याच आवारात भारतीय बैठकीत सहभोजनचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. हे रुचकर आणि स्वादिष्ट जेवण बनविणे, ते सगळ्यांना वाढून नंतर जागा परत लख्ख करून ठेवणे ही सारी जबाबदारी ग्रामस्थांनी हसतमुखाने पेलली.

भोजनानंतर झालेल्या सवेश सादरीकरणात संभाजीराजे यांच्या जीवनाचे दोन वेगवेगळे पैलू दाखविणारे प्रसंग विष्णू गावस आणि कु. आदिनाथ बोट्टरकर यांनी प्रभावीपणे सादर करून दर्शकांकडून वाहवा मिळवली. आदिनाथ बोट्टरकर यांनी संभाजीराजे कारागृहात असताना त्यांच्यावर जे अत्याचार झाले आणि त्या प्रसंगासही राजे कसे खंबीरपणे सामोरे गेले हे प्रभावीपणे दर्शविले. त्याची अंगभूत नाट्यकला आणि त्याने साकारलेला राजेंचा आवेश वाखाणण्याजोगा होता. विष्णू गावस यांची भारदस्त शैली आणि साकारलेले संभाजी राजे तर मनात घर करून राहिले. तसेच इयत्ता दुसरीत शिकणारी आरोही वेरेकर हिने जिजाऊ माता साकारल्या. तो तिचा आवेश तर प्रेक्षकांना थक्क करणारा होता. इतक्या छोट्याशा वयात तिने आपली कला निर्भिडपणे सादर केली यासाठी तिचे सर्वांनी कौतुक केले. या सत्राचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. सरोजिनी गावकर यांनी केले.
त्यानंतर झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद आनंद मयेकर यांनी भूषविले. सत्तरीतील निमंत्रित तसेच नवोदित कवी यांच्या एकापेक्षा एक सुंदर कवितांनी कविसंमेलन बरेच रंगले. कविता हा तसा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय तसेच श्रोत्यांच्या थेट हृदयाचा वेध घेणारा असल्यामुळे विविध कवींनी सादर केलेल्या कवितांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन हीरा गावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते त्यानंतर झालेले सांस्कृतिक सत्र. गोव्यातील उत्कृष्ट तबलापटू माननीय अमित भोसले आणि त्यांचे शिष्य साथीदार यांनी आपल्या काव्यातून तबल्याच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तिमंत उभे करून अवघा परिसर शिवमय करून सोडला. या शिववंदनेने सांस्कृतिक सत्राची जोरदार सुरुवात झाली. या सत्राचे सूत्रसंचालन रामनाथ खोत यांनी केले.
त्यानंतर झालेल्या संगीत कार्यक्रमात सत्तरीतील नामवंत, उभरते गायक सर्वश्री ज्ञानेश्वर गावस, संदीप गावकर, गुरुदास गावस, प्रवीण नाईक, मनोज गणपुले यांच्या नाट्यगीत, भक्तिगीत, शास्त्रीय संगीत, अभंग यांच्या सुरेल सादरीकरणाने अवघा परिसर मंत्रमुग्ध होऊन गेला.
जुन्या काळात आई, आजी जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आपल्या सुख-दुःखाच्या गोष्टी, कथा, कविता या ओव्यांतून गुंफल्या जायच्या. त्या ओव्या ऐकल्या की नकळत आपले मनही त्या काळात हळूच जाऊन पोहोचते. जाती आता वापरात नाहीत पण ही ओव्यांची ठेव आजही गोमंतकाच्या ग्रामीण भागात स्त्रियांनी जपून ठेवली आहे. संगीत सत्रानंतर शिक्षिका सौ. सरोजिनी गावकर आणि समूहाने ओव्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यानंतर वनदेवी गट, नानेली- सत्तरी यांनी कळशीनृत्य हे बहारदार पारंपरिक नृत्य सादर केले. ज्ञानज्योती महिला मंडळ, केरी यांनी सादर केलेली फुगडी तर इतकी ऊर्जाभरीत होती की ती नुसती पाहूनच गणेशचतुर्थीच्या दिवसांतील आल्हादक आनंद सार्‍यांनाच स्पर्शून गेला. त्यांनी उत्साहात विविध प्रकारच्या फुगड्यांचे सादरीकरण केले. ही सर्व लोकनृत्ये पाहून हेच वाटले की आपला हा पारंपरिक वारसा ग्रामीण परिसराने जतन करून ठेवल्याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत.

त्यानंतर गुरुदास सुतार यांनी खास मराठी दिनानिमित्त सादर केलेली मराठीचे गुणगान गाणारी स्वरचित भैरवी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. सांस्कृतिक सत्राचे सूत्रसंचालन श्रेया गावकर आणि बबिता शेळके यांनी केले.
शेवटी आभार प्रदर्शन नवनाथ गावस यांनी केले आणि कार्यक्रमाची यशस्वी सांगता विश्वप्रार्थना असलेल्या पसायदानाने झाली.

अशा साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सहसा संगीत क्षेत्रातील मंडळींचा सहभाग नसतो, त्यामुळे उपस्थित संगीत क्षेत्रातील कलाकारांनी असे कार्यक्रम एवढे सुंदर असतात याची अनुभूती घेऊन यापुढे या कार्यक्रमांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवर्जून सांगितले. या अनुभवाने ते भारावूनच गेले आणि आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी एवढ्या सुंदर साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी अकादमीने दिली याबद्दल अकादमीचे आभार मानून यापुढील कार्यक्रमांस आपला सक्रिय सहभाग असेल असे आश्वासन दिले.
कोविड महामारीमुळे निस्तेज झालेल्या वातावरणात या संमेलनाने एक सकारात्मक ऊर्जा नांदती केली, तसेच अनेक नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. त्या नयनरम्य अशा दत्तमंदिर परिसरात पार पडलेला तो कार्यक्रम ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हीच घोषणा जणू देत होता. एकंदरीत हा सोहळा एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम पाहिल्याचा, ऐकल्याचा अविस्मरणीय आनंद देऊन गेला.