मराठीतून प्राथमिक शिक्षणासाठी प्रयत्न करुया : मुख्यमंत्री

0
191
‘गोमंत संत’ कार्यक्रमात मान्यवरांचा गौरव करताना प्राचार्य गोपाळराव मयेकर. बाजूस वल्लभ केळकर, संजय हरमलकर व अन्य.

मराठी ही संस्काराची भाषा आहे. सोहिरोबानाथ मराठीतून शिकले नी संतपदाला पोचले. त्यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी ही खूप प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथे केले. मराठीतून शिकून संस्कार आत्मसात करायला हवेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतूनच व्हावे यासाठी प्रयत्न करुया असे ‘गोमंत संत’ कार्यक्रमाच्या समारोप समारंभात बोलताना ते म्हणाले.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोपाळराव मयेकर, इन्स्टिट्यूट ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर, लोकमित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बर्वे, मार्गदर्शक प्राचार्य अनिल सामंत, कार्यवाह वल्लभ केळकर उपस्थित होते. पार्सेकर यांनी सांगितले, की संतांची परंपरा महाराष्ट्राला, देशाला आहे तशीच गोव्याला आहे. संत सार्‍या समाजाचा विचार करतात. तुकारामाच्या रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या अभंगातून तसेच ज्ञानेश्वरांच्या प्रसायदातून याचा प्रत्यय येतो. मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण होणे हितकारक आहे हे स्पष्ट करताना पार्सेकर म्हणाले, माझ्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत मराठी माध्यम असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले, याचा प्रत्यय आलेला आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या सरकारी प्राथमिक शाळांकडे नंतरच्या काळात दुर्लक्ष झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. आपण पूर्व प्राथमिक, प्राथमिक स्तरावर दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वावरलो तर सर्व प्रश्‍नांना उत्तरे मिळतील. मी कोकणी बोलत असलो तरी माझा पिंड मराठीवरच पोसलेला आहे हेही त्यांनी सांगितले. मराठी संस्थाना अनुदान कमी मिळत असेल तर त्याचा दोन पावले टाकून विचार जरूर केला जाईल असे उपस्थित झालेल्या तक्रारीवर त्यांनी खुलासा करताना स्पष्ट केले.
प्राचार्य मयेकर यांनी गोव्यात संतांचे अभंग मोठ्या प्रमाणात गाऊन दिलेल्या योगदानाबद्दल भजनी मंडळाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, संतवाणीची समृद्ध परंपरा गोव्याला लाभली आहे. प्राचार्य सामंत यांनी प्रास्ताविकात, गेल्या दहा-पंधरा वर्षात गोव्यातील मराठी संस्थाकडे चांगले नेतृत्व दिसत नसल्याचे नमूद करून संस्थांचे काम बेटा बेटात विखुरले आहे, त्यांना एकत्र आणण्याचा हेतू स्पष्ट केला. सगळ्या मराठी संस्था एकत्र आल्यास रचनात्मक कार्य करता येईल असे स्पष्ट करुन ते म्हणाले, मराठी शाळा टिकविणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पहिली ते चौथीपर्यंत मुलांना मराठी लिहिता वाचता येणे गरजेचे आहे. गावागावातील संस्थांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ कोकणीच्या माध्यमातून शिकणारे विद्यार्थी चांगले कोकणी लिहू शकणार नाही त्यांना मराठीही शिकावी लागणार आहे हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
या कार्यक्रमातील सद्भाव सोहळ्यात मराठी भाषा, संस्कृतीसाठी कार्य करणार्‍या संस्थांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला त्यांचे प्रतिनिधी जनार्दन वेर्लेकर (गोमंत विद्या निकेतन), गो. रा. ढवळीकर (गोमंत मराठी भाषा परिषद), नितीन कोरगावकर (गोमंतक साहित्य सेवक मंडळ), संजय हरमलकर (गोमंतक मराठी अकादमी), सागर जावडेकर (कोकण मराठी परिषद गोवा), ऍड. नारायण सावंत (मराठी साहित्य सेवा संघ, साखळी), गजानन मांद्रेकर (साहित्य संगम, मांद्रे), विजय नाईक (गोमंतक मराठी साहित्य परिषद, वाळपई), सुदेश आर्लेकर (जागर प्रकाशन) व महेश नागवेकर (अ. गो. मराठी विषय अध्यापक संघटना) यांनी तो मुख्यमंत्र्यांहस्ते स्वीकारला.