मयेकरसरांच्या काही आठवणी…

0
117
  • नारायण महाले

सरांचे अवघे व्यक्तिमत्त्व हे कष्टाच्या आणि संघर्षाच्या मुशीतूनच घडले- त्यामुळे असेल कदाचित- सर नेहमी नम्र, कोमल भाववृत्तीचे राहिले. त्यांनी उच्च पदाचा बडेजाव बाळगला नाही. ते सर्वांचे मित्र होते. मार्गदर्शक होते. ‘गुरू’ही होते.

‘मी रिताच आलो होतो, जाणार रित्या हातांनी’ असं म्हणणारे मयेकरसर गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला अनंताच्या यात्रेला निघून गेले. पण त्यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी ठसे मागे ठेवले आहेत, यांची जाणीव मला या क्षणी होत आहे. त्यांच्या सहवासातील संस्मरणीय अशा आठवणी याप्रसंगी सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.
साहित्य, कला, भाषा, संस्कृती, समाजकारण, राजकारण, भाषाकारण, प्रभावी व रसाळ वक्तृत्व अशा कितीतरी जीवनपैलूंनी सरांचे व्यक्तिमत्त्व फुलून आले होते. त्यांच्या समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला दुरूनच घडला.

मयेकरसर हे माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांना गुरुस्थानी होते. एम.ए.ला मराठीच्या विद्यार्थ्यांना सर ज्ञानेश्‍वरी शिकवायचे. ज्ञानेश्‍वरीतील एकेका ओवीचे- अध्यायाचे ते आपल्या रसाळ वाणीने निरुपण-विवेचन करीत. अगदी तन्मय, तल्लीन होऊन ते ज्ञानेश्‍वरीवर बोलायचे. प्रत्येक ओवी तोंडपाठ… हातात संदर्भासाठी ज्ञानेश्‍वरी नाही… ज्ञानेश्‍वरीतील सौंदर्यस्थळे, मर्मस्थाने मानवी जीवनातील एकेक उदाहरण देऊन सोदाहरण सांगताहेत अशी सरांची त्यावेळी शिकवत असतानाची प्रतिमा आजही माझ्या डोळ्यांसमोर येते आहे. आमच्या विद्यार्थिदशेत सरांनी आम्हाला ज्ञानेश्‍वरी अगदी सुगम व सुलभ, सोप्या रीतीनं समजावून दिली. ज्ञानेश्‍वरी हा ग्रंथ परीक्षेपुरता, तसेच वाढत्या वयात किंवा वृद्धपणी वाचण्याचा ग्रंथ नव्हे; तर ज्ञानेश्‍वरी हा नित्य जीवनात जगण्याचा मंत्रच आहे हेही सांगितले. ज्ञानेश्‍वरीतील ‘पसायदान’ हे तर सरांच्या जीवनपुस्तकाचे एक सुंदर पान होते. पसायदानावर सर किती भरभरून बोलायचे!

सरांनी आपल्या खासदारकीच्या लोकसभेतील पहिल्याच भाषणात ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानातील ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्‍वस्वधर्म सूर्ये पाहो’ या ओवीच्या उच्चारातून जनतेला शुभेच्छा दिल्या होत्या, त्या प्रसंगाचे स्मरण याप्रसंगी होत आहे. ज्ञानेश्‍वरीवर बोलावं ते मयेकरसरांनीच अशी आमची त्यावेळी धारणा होती. ती इतक्या वर्षांनंतरही नाहीशी होऊ शकली नाही. ज्ञानेश्‍वरीवरील सरांच्या कितीतरी व्याख्यानांच्या न मिटणार्‍या रसाळ आठवणी आजही स्मरणात आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या संतवाङ्‌मयावरील परिसंवादामध्ये सरांना बोलताना मी पाहिले आहे. ते बोलायला लागले की परिसंवादाच्या मर्यादित वेळेचं त्यांना भान नसायचं. त्यांच्या भाषणात पांडित्याचा लवलेशही नसायचा. त्यातून त्यांना संतवाङ्‌मयाबद्दल वाटणारी आत्मीयता तसेच संतवाङ्‌मयाचे त्यांचे सखोल चिंतन व अभ्यास दिसून यायचा.

ज्ञानेश्‍वरीच्या शब्दकळेत ओलाचिंब न्हाऊन निघालेला एक हळवा भावकवी मयेकरसरांमध्ये लपला होता. त्यांच्या तोंडून त्यांच्याच कविता खूप वेळा ऐकल्या आहेत. त्यांचा ‘स्वप्नमेघ’ हा काव्यसंग्रह त्यांच्या भावविभोर, हळव्या मनोवृत्तीची साक्ष देतो.
सरांचे व्यक्तिमत्त्व हे एकाएकी व अधांतरी घडलेले नाही; त्यांना जीवनप्रवासामध्ये खूपच संघर्ष करावा लागला याचा प्रत्यय त्यांचे ‘मज दान कसे हे पडले’ हे आत्मचरित्र वाचताना येतो.
संघर्ष हाच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा पाया असावा असे मला वाटते. जीवनाच्या संघर्षमय वाटचालीत मयेकर मराठीचे ‘सर’ (प्राध्यापक/प्राचार्य) बनले. तरुणवयातच शिक्षण खात्याचे मंत्रीही झाले.

मयेकरसरांचे गोवा राजभाषा चळवळीतील कार्य मी जवळून पाहिले आहे. १९८५-८७ च्या कालखंडात कोंकणी-मराठी राजभाषेच्या मुद्द्यावरून गोव्यातील एकंदरीत लोकजीवन ढवळून निघाले होते. कोंकणी-मराठी राजभाषेसाठी आक्रमक आंदोलने झाली. ‘मराठी हा गोमंतकाचा आत्मस्वर आहे’ अशी ठाम भूमिका घेऊनच ते राजभाषा आंदोलनामध्ये सक्रियपणे उतरले. आपल्या जीवाची, नोकरीची व वेळेची पर्वा न करता ते मराठीसाठी इतरांच्या बरोबरीने लढत राहिले. गोवा राजभाषा आंदोलनप्रसंगी कुंपणावर उभे राहून किंवा ‘नरो वा कुंजरो वा’ करत त्यांना मराठीची व्यासपीठीय सेवा करता आली असती, मराठी भाषेचे गोडवे गाणारी व्याख्यानं, भाषणं करता आली असती; पण ते प्रत्यक्षरीत्या आंदोलनामध्ये उतरले. आंदोलनाचे ताण-तणाव भोगत राहिले.

गोमंतक मराठी अकादमीची निर्मिती मराठी राजभाषा आंदोलनातून झाली. गो. म. अकादमीच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये मयेकरसरांचेही योगदान आहे. स्व. शशिकांत नार्वेकर, स्व. विनायक नाईक, स्व. जयसिंगराव राणे, स्व. नारायण आठवले, स्व. शशिकला काकोडकर आणि सध्या हयात असलेल्या अनेक मराठी लढवय्यांच्या खांद्याला खांदा भिडवून ते मराठीच्या उन्नतीसाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहिले. गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्षस्थान त्यांनी भुषविले. शशिकांत नार्वेकरांच्या निधनानंतर अकादमीच्या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी होऊन ते परत एकदा अध्यक्ष झाले. मराठीसाठी रामदासी झोळी घेऊन इतरांबरोबर फिरणार्‍या मयेकरसरांना मी पाहिले आहे.

अकादमीचे ‘अध्यक्ष’ म्हणून ते अकादमीच्या केबिनमध्ये स्वस्थ बसून राहिले नाहीत. त्यांनी मराठीच्या संस्कारासाठी गावोगावी गो. म. अकादमी संचालित ‘संस्कार केंद्रे’ उभारली आणि संस्कार केंद्रांच्या माध्यमातून ‘मराठी भाषा सप्ताह’ ही संकल्पनाही प्रभावीपणे राबवली. अकादमीचे कार्य वाङ्‌मयीन स्वरूपाचे न ठेवता ते विविधांगी केले. एकदिवसीय साहित्य मेळाव्यातून इतर कलांनाही उत्तेजन दिले. जिथे मराठी तिथे मयेकरसर स्वतःहून गेले आहेत. एखादा पुस्तक प्रकाशनाचा समारंभ असो वा साहित्यसंमेलन असो, शारीरिक कष्टांची पर्वा न करता मयेकरसर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. अलीकडे त्यांना आरोग्य साथ देत नव्हते. तरीपण एखादं आग्रहाचं निमंत्रण मिळालं की ते तरुणाच्या उत्साहाने यायचे. वाढत्या वयातही त्यांची स्मरणशक्ती आणि बुद्धी तल्लख राहिली. रसाळ वाणीतला मूळ गोडवा कमी झाला नव्हता. ‘वाढत्या वयामुळे माझं शरीर थकत चाललं आहे, पण स्मरणशक्ती शाबूत आणि तल्लख आहे’ असे ते मिस्कीलपणे म्हणायचे.

शिक्षक, प्राचार्य, मंत्री, खासदार, मराठीचा निस्सिम उपासक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मी पाहिले आहेत. त्यांनी शिक्षणक्षेत्रातली आणि राजकीय क्षेत्रातली उच्च पदं भूषवली. सरांचे अवघे व्यक्तिमत्त्व हे कष्टाच्या आणि संघर्षाच्या मुशीतूनच घडले, त्यामुळे असेल कदाचित- सर नेहमी नम्र, कोमल भाववृत्तीचे राहिले. त्यांनी उच्च पदाचा बडेजाव बाळगला नाही. ते सर्वांचे मित्र होते. मार्गदर्शक होते. ‘गुरू’ही होते. या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या काही प्रसंगी जवळ जाण्याचं भाग्य मलाही लाभलं.

‘मी रिताच आलो होतो, जाणार रित्या हातांनी’ असं मयेकरसर म्हणालेत खरं, पण ते रिकाम्या हातांनी गेले असं मी मात्र म्हणणार नाही.
‘मी असा नक्षत्रगामी गुंतलो रंगी फुलांच्या, जोडले नाते युगाचे वेदनेच्या या धरेच्या’ असे म्हणणार्‍या ‘गुरुवर्य’ मयेकरसरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.