ममतांचा महाविजय

0
86

सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्‍चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड मताधिक्क्याने काल निवडून आल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीतील नंदीग्राममधील पराभवाचे उट्टे भवानीपूरमधून त्यांनी काढले आहे. २०११ च्या निवडणुकीतील मतांपेक्षा अधिक मताधिक्क्य तर यावेळी त्यांना मिळाले आहेच, शिवाय पाच महिन्यांपूर्वी ह्याच मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सोवनदेव चट्टोपाध्याय यांना मिळालेल्या मतांपेक्षाही अधिक मते घेऊन ममतांनी बाजी मारली आहे.
ममता आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत जंग जंग पछाडूनही तृणमूलने आपली सत्ता कायम राखली होती. मात्र, नंदीग्राममधील ममतांच्या पराभवामुळे गड आला पण सिंह गेला अशी तेव्हा स्थिती झाली होती. त्यामुळेच भवानीपूरच्या पोटनिवडणुकीत काय होते त्याबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता होती.
राज्याचा मुख्यमंत्री असलेला उमेदवार पोटनिवडणुकीत विजयी होणे हे सहसा तसे कठीण नसते, परंतु ममतांविरोधात देशातील सर्वांत प्रबळ राजकीय पक्षाने उघडलेली आघाडी लक्षात घेता त्यांचा विजय मोठा ठरतो. भाजपने ह्या पोटनिवडणुकीमध्ये प्रियांका टिबरीवाल यांच्या रूपाने एका तरुण वकील कार्यकर्तीला उमेदवारी दिलेली होती. त्यामुळे तशी ही पोटनिवडणूक एकतर्फीच होती. शिवाय भारतीय जनता पक्षाच्या बड्या बड्या नेत्यांनी ह्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरण्याचे टाळले होते. कॉंग्रेसने स्थानिक नेते अधिररंजन चौधरींचा विरोध डावलून ममतांविरोधात आपला उमेदवार उभा केलेला नव्हता, त्यामुळे मतविभाजनही टळले. शिवाय भवानीपूर हा नवा मतदारसंघ २०११ साली बनला तेव्हापासून तो तृणमूलचा बालेकिल्ला आहे. ममतांचे निवासस्थान असलेला कालीघाटचा परिसरही ह्याच मतदारसंघात मोडतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ममता बॅनर्जींचा विजय हा तसा चकीत करणारा नाही. पण गेल्या निवडणुकांत ज्या प्रभागांमध्ये बहुमत मिळालेले नव्हते, त्या प्रभागांमध्येही यावेळी यश संपादन केलेले असल्याने ममता आणि त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने हा विजय मोठा ठरतो. ह्याचे आणखी एक कारण म्हणजे भवानीपूर मतदारसंघातील तब्बल ४३ टक्के मते ही बिगर बंगाली मतदारांची आहेत. एक प्रकारे मिनी भारतच तेथे वसलेला आहे. त्यामुळे पारंपरिक बंगाली मतदारांपलीकडेही आपल्याला कशी स्वीकारार्हता आहे हे दाखवण्यासाठी ममता आता आपल्या ह्या विजयाचा उपयोग नक्कीच करणार आहेत.
ममता बॅनर्जींचा डोळा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर आणि पंतप्रधानपदावर आहे हे आता लपून राहिलेले नाही. भाजप विरोधकांची एकजूट बांधण्याच्या मिशाने त्या देशभरात आपली स्वीकारार्हता वाढविण्याच्या मागे गेल्या अनेक महिन्यांपासून लागलेल्या आहेत. त्यासाठी पश्‍चिम बंगालबाहेर पडून आपल्या प्रादेशिक पक्षाचा झेंडा गोव्यापासून त्रिपुरापर्यंत फडकवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या सध्या आहेत. गोव्यात लुईझिन फालेरोंच्या रूपाने एक अनुभवी मोहरा आणि काही प्यादी त्यांच्या हाती लागली आहेत. भवानीपूरच्या विजयामागे असलेला परप्रांतीय मतदार पाहता आपण आता भारताचे नेतृत्व करण्यास पात्र आहोत आणि भाजपविरोधी सर्वांत आक्रमक नेतृत्व म्हणून देश आपल्याकडे पाहतो असा आत्मविश्वास ममतांना हा विजय मिळवून देणार आहे.
गेल्या एप्रिल – मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी जखमी वाघिणीसारख्या लढल्या आणि त्यांच्या पराभवासाठी सर्व त्या साधनांचा वापर भाजपने केलेला असूनही त्या पक्षाची डाळ तेथे शिजू शकली नाही. जे संख्याबळ प्राप्त झाले होते, तेही आता हळूहळू घसरणीला लागले आहे. बाबुल सुप्रियोंसारख्या अनेकांनी भाजपला रामराम ठोकला आहे. तृणमूलमध्ये माघारी परतणार्‍यांची यादी मोठी आहे. भाजपचे संख्याबळ पाच महिन्यांतच ७७ वरून ७१ पर्यंत आलेले आहे. आता भवानीपूरच्या ममतांच्या यशानंतर घरवापसी करणार्‍यांची ही यादी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची जी हवा पश्‍चिम बंगालात निर्माण झाली होती, ती आता हळूहळू ओसरू लागली आहे. याचा फायदा घेत ममता आपले स्थान अधिक दृढ करण्यामागे लागतील असे दिसते. आता त्यांचे लक्ष्य २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि त्यामध्ये देशाचे नेतृत्व करणे हे असेल आणि त्या दृष्टीने आपल्याला देशभरात स्वीकारार्हता मिळावी ह्या दृष्टीने त्यांची पुढील वाटचाल अधिक आत्मविश्वासपूर्वक आणि जोमाने होईल यात शंका नाही.